ऐरोलीचे माजी नगरसेवक मढवी दोन वर्षांसाठी तडीपार

१ ऑक्टोबर रोजी एम.के.मढवी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील व्हा
ऐरोलीचे माजी नगरसेवक मढवी दोन वर्षांसाठी तडीपार

नवी मुंबईत पोलीस उपायुक्त आणि एेरोलीतील माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मढवी यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक असणारे मनोहर मढवी यांनी आपल्यावर शिंदे गटात सामील होण्यासाठी पोलीस उपायुक्तांकडे दबाव टाकला जात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मनोहर मढवी यांची मागील गुन्हेगारी कृत्यांची फाईल बाहेर काढून त्यांना ठाणे व मुंबई उपनगर या जिल्ह्यांतून २ वर्षासाठी हद्दपार केले आहे. शुक्रवारीच या हद्दपारीची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-१ चे पोलीस उपाआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली. मढवी यांना तडीपार करण्यात आल्याने नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

१ ऑक्टोबर रोजी एम.के.मढवी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील व्हा, नाही तर तडीपार करुन तुमचा एन्काऊंटर करु, अशी धमकी तसेच आपल्याकडे १० लाखांची मागणी परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केल्याची आणि पोलिसांकडून छळवणुक होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर शिवतीर्थावर झालेल्या सभेत उध्दव ठाकरे यांनी भाषणात देखील एकनाथ शिंदे गटाकडून शिवसैनिकांना कशा प्रकारे त्रास दिला जात आहे हे स्पष्ट करताना मढवी यांचा उल्लेख केला होता. तर निव्वळ तडीपारीची कारवाई होऊ नये म्हणून मढवी यांनी आपल्यावर खोटे-नाटे आरोप करत असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. त्यानंतर दसरा मेळाव्याच्या अवघ्या ४८ तासानंतर ही कारवाई करण्यात आल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप केल्यानेच ही कारवाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

गोठीवली गावात राहणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मढवी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुलबा ढाकणे यांनी गत ७ जुलै रोजी परिमंडळ-१ च्या पोलीस उपायुक्तांकडे पाठविला होता. सदर प्रस्तावाची वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डी.टी. टेळे यांनी प्राथमिक चौकशी करुन एम.के.मढवी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन त्यांना २ वर्षासाठी मुंबई उपनगरे, ठाणे व रायगड या तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्याची शिफारस परिमंडळ-१ च्या पोलीस उपायुक्तांकडे केली होती. सदर प्रकरणाची चौकशी सुरू असताना, एम.के.मढवी यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात ५०६ प्रमाणे अदखलपात्र गुह्याची नोंद झाली. त्याचप्रमाणे गणेशोत्सवात विसर्जनाच्या दिवशी मढवी यांच्यावर दंगलीसह मारामारीचा गुन्हा दाखल झाला होता.

शिंदे गटात जाण्यासाठी आपल्याला जाणूनबुजून पोलीस खोटया-नाटया गुह्यात अडकवत असल्याचा आरोप एम.के. मढवी यांनी केला होता. एम. के. मढवी यांच्या विरोधात सुरू असेलल्या हद्दपारीच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने १५ सप्टेंबर रोजी त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला होता. त्यानंतर एम.के.मढवी यांच्या विरुध्द सुरू असलेल्या हद्दपार प्रकरणात वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त टेळे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतील मुद्दे त्याचप्रमाणे त्यांची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेवून ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या हद्दपार आदेशान्वये एम.के.मढवी यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (व) प्रमाणे ठाणे व मुंबई उपनगरे या दोन जिल्हयातून २ वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसारे यांनी दिली. सत्ता बदलानंतर ऐरोली विधानसभा मतदार संघातील मढवी त्यांच्या पत्नी विनया मढवी आणि मुलगा करण मढवी यांनी शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांना साथ दिली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in