नवी मुंबई : सिमेन्स कंपनीत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका सायबर टोळीने ऐरोलीत राहणाऱ्या व्यक्तीची मुलाखत घेत असल्याचे भासवून त्याला बनावट ऑफर लेटर तसेच नोकरी लागल्याबाबतची बनावट कागदपत्रे पाठवून त्याच्याकडून ५ लाख ९९ हजाराची रक्कम ऑनलाईन पद्धतीने उकळल्याचे उघडकीस आले आहे. रबाळे पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी तसेच आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार प्रणित सावे (४७) हे ऐरोली सेक्टर-१९ मध्ये राहण्यास असून त्यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या पूर्वीच्या नोकरीचा राजीनामा दिल्याने ते नवीन नोकरीच्या शोधात होते. यादरम्यान गत महिन्यात अज्ञात सायबर चोरट्याने रिशव शर्मा या नावाने सावे यांना संपर्क साधून जॉबसाठी काही कंपन्याची नावे सुचवून त्यांची ऑनलाईन मुलाखत घेण्यात येणार असल्याचे तसेच पहिल्या मुलाखतीत पास झाल्यानंतर ५ हजार रुपये रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल असे सांगण्यात आले. त्यानुसार या सायबर टोळीने मुलाखतीसाठी सावे यांच्या ईमेलवर कंपन्यांची नावे पाठवून देण्यात आली. काही दिवसांनंतर या टोळीने मुलाखत घेण्याचा बहाणा करून त्यात पास झाल्याचे त्यांना भासवण्यात आले.
त्यानंतर सदर टोळीने सांगितल्यानुसार सावे यांनी ५ हजार रुपये व त्याची कागदपत्रे सदर टोळीला पाठवून दिली. त्यानंतर सायबर टोळीने सावे यांना रजिस्ट्रेशन फी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल चेकअपसाठी १ लाख ४ हजार २९० रुपये पाठवून दिले. त्यानंतर सायबर टोळीने सावे यांना सिमेन्स कंपनीतील जॉबसाठी मेडिकल सुपरव्हिजन ॲंड डॉक्युमेंट, एम्प्लॉयमेंट ॲग्रीमेंट, ट्रेनिंग सिक्युरिटी व सेटप्स यासाठी आणखी ४ लाख ९५ हजार रुपये पाठवण्याचे सांगितल्यानंतर सावे यांनी ती ऑनलाईन पद्धतीने पाठवून दिले.
काही दिवसानंतर सावे यांनी सायबर टोळीच्या मोबाईल नंबर व ईमेलवर संपर्क साधला असता, त्यांचे सर्व मोबाईल फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर सावे यांनी खऱ्या टाइम्स जॉबच्या व सिमेन्सच्या वेबसाइटवर ईमेलद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी सदरची कागदपत्रे बनावट असल्याची माहिती दिली. त्यानंतर सावे यांनी रबाळे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.