

मुंबई : राज्य सरकारच्या विविध विभागाची विकास कामे मार्गी लावल्यानंतर ही देयकाची दोन कोटींची थकीत रक्कम न मिळाल्याने कंत्राटदार गजानन देवकाते यांनी टोकाचे पाऊल उचलले. नवी मुंबई येथे राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. देवकाते यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त पसरले आणि राज्यातील कंत्राटदारामध्ये संतापाची लाट उसळली आहे. देवकाते यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यावर आठ दिवस कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कंत्राटदार महासंघाने दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील कंत्राटदार यांचे सर्व विभागाकडील जवळपास ८६ हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत. याबाबत सातत्याने महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना उपोषण, आंदोलन, मोर्चा यासारख्या विविध मार्गाने आंदोलन करीत आहेत. याबाबत सातत्याने लिखित स्वरूपात शासनासमोर मांडले आहे, मुख्यमंत्री यांना बैठकीची वेळ गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून प्रतिसाद मिळत नाही . त्यातच मंगळवार २५ ऑगस्ट रोजी आमचे कंत्राटदार गजानन देवकते (४५) राहणार नवीमुंबई यांनी आपल्या घरात दुर्दैवाने आत्महत्या केली.
देयकाची रक्कम मिळत नसल्याने प्रचंड ताण व मनस्ताप त्यांना झाला होता. अखेर त्यांनी आपले जीवन दुर्दैवाने आत्महत्या करून संपविले.. यामुळे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना ने महाराष्ट्र चे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री,त्यांचे सचिव यांचे कडे पत्राद्वारे मागणी केली आहे या प्रकरणात जे अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावर तातडीने संबंधित विभागाने कायदेशीर कारवाई करावी, तसे लिखित पत्र संबंधित खात्याने निगर्मित येत्या आठ दिवसांत करावे, तसे न झाल्यास राज्यात कंत्राटदार व अभियंता यांचे मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.