
नवी मुंबई : राज्याच्या वन खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर आ. गणेश नाईक यांचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नागपूरवरून प्रथमच २२ डिसेंबर रोजी नवी मुंबईमध्ये आगमन झाले. यावेळी नामदार नाईक यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
विमानतळावर नाईक यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत केले. नवी मुंबई नगरीत पोहोचल्यावर नाईक यांनी सर्वप्रथम ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या अतिश बाजीत अतिशय उत्साही आणि जल्लोषात आ. गणेश नाईक यांचे स्वागत करण्यात आले. माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी मोठ्या संख्येने भेट घेऊन नाईक यांचे अभिनंदन केले.