घणसोलीत एटीएम कार्डधारकांना लुबाडणारी टोळी सक्रिय

चोरट्यांनी गत आठवड्याभरामध्ये दोघांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांच्या खात्यातून ५८,३०० रुपये काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे
घणसोलीत एटीएम कार्डधारकांना लुबाडणारी टोळी सक्रिय
Published on

नवी मुंबई : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींना विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाऱ्या चोरट्यांचे घणसोलीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या चोरट्यांनी गत आठवड्याभरामध्ये दोघांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांच्या खात्यातून ५८,३०० रुपये काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. रबाळे पोलिसांनी या चोरट्याविरोधात गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

घणसोली येथील घरोंदा वसाहतीत राहणाऱ्या निशिगंधा गुरव (४८) या गत २३ जानेवारी रोजी आपल्या मुलासह घणसोली सेक्टर-९ मधील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी मदत करण्याच्या बहाण्याने एटीएममध्ये घुसलेल्या दोघा चोरट्यापैकी एकाने निशीगंधा गुरुवांना बोलण्यात गुंतवून एटीएम मशीनमधील त्यांचे एटीएम कार्ड काढून घेत, त्याऐवजी दुसरे एटीएम कार्ड त्याजागी ठेवून त्याठिकाणावरून पळ काढला. सदर चोरट्यांनी निशिगंधा गुरव यांच्या एटीएम कार्डचा वापर करून ३३,३०० रुपये काढून घेतले.

तर दुसऱ्या घटनेत घणसोलीतील सिम्प्लेक्स वसाहतीत राहणारे मोहन चौधरी (६५) हे सेक्टर-९ मधील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता एका चोरट्याने सदर एटीएममध्ये प्रवेश करून मोहन चौधरी यांना पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला. त्यानंतर सदर चोरट्याने मोहन चौधरींना बोलण्यात गुंतवून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांच्या एटीएम कार्डचा दुसरीकडे वापर करून २५ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर चौधरी यांनी आपले एटीएम कार्ड ब्लॉक करून रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in