Navi Mumbai : घारापुरी बंदरावर नवीन प्रवासी जेट्टी उभारणार; मेरीटाईम बोर्डामार्फत ८८ कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव सादर

जगप्रसिद्ध एलिफंटा बेटावर आत्ता नवीन जेट्टी उभारण्यात येणार असून त्यासाठी मेरीटाईम बोर्डाने ८८ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर केला आहे. घारापुरीची लेणी पाहण्यासाठी देश, विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालल्याने सध्या असलेल्या शेतबंदर जेट्टीवर कमालीचा ताण पडत आहे. हा ताण कमी व्हावा, यासाठी एलिफंटा बेटावर लवकरच नवी जेट्टी उभारण्यात येणार आहे.
Navi Mumbai : घारापुरी बंदरावर नवीन प्रवासी जेट्टी उभारणार; मेरीटाईम बोर्डामार्फत ८८ कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव सादर
Published on

उरण : जगप्रसिद्ध एलिफंटा बेटावर आत्ता नवीन जेट्टी उभारण्यात येणार असून त्यासाठी मेरीटाईम बोर्डाने ८८ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर केला आहे. घारापुरीची लेणी पाहण्यासाठी देश, विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालल्याने सध्या असलेल्या शेतबंदर जेट्टीवर कमालीचा ताण पडत आहे. हा ताण कमी व्हावा, यासाठी एलिफंटा बेटावर लवकरच नवी जेट्टी उभारण्यात येणार आहे.

सागरमाला योजनेतून उभारली जाणारी नवी जेट्टी सहा मीटर रुंदीची आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. नव्या जेट्टीवर पर्यटकांसाठी निवारा शेड, स्वच्छतागृह, बैठकीची व्यवस्था यांसह अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने व्यक्त केला आहे. काळ्या पाषाणामध्ये कोरलेल्या लेण्यांमुळे एलिफंटाचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये करण्यात आला आहे. शिवाची विविध रूपे साकारली असून लेण्या पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातून २० लखापेक्षा अधिक पर्यटक येत असतात. गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने पर्यटक शेतबंदर जेट्टीपर्यंत येतात.

सध्या ही जेट्टी फक्त चार मीटर रुंदीची असल्याने बोटीमध्ये चढ-उतार करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना पर्यटकांना करावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांना अधिक त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने नवी जेट्टी बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नव्या जेट्टीमुळे हा त्रास कमी होणार

शेतबंदर जेट्टीपासून लेण्यांच्या पायऱ्यांपर्यंत सुमारे एक किलोमीटर अंतर चालत जावे लागते. नव्या प्रशस्त जेट्टीमुळे हा त्रास काहीसा कमी होईल, असे मेरीटाईम बोर्डाचे म्हणणे आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या चार मीटर रुंदीच्या मार्गावरूनच मिनी ट्रेन धावते. ही ट्रेन बच्चे कंपनीचे आकर्षण असून जेट्टी अरुंद असल्याने चालत जाणाऱ्या पर्यटकांना त्रास होतो. मात्र नव्या जेट्टीमुळे हा त्रास कमी होणार आहे.

सहा मीटर रुंदीची नवी जेट्टी बांधत असतानाच चार मीटर रुंद असलेल्या जुन्या जेट्टीचेही मजबुतीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना ये-जा करणे सोयीचे होणार असून पर्यटकांच्या गरजा लक्षात घेऊनच हे काम करण्यात येईल. पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची काळजी नवी जेट्टी बांधताना घेतली जाणार आहे. पुरातत्त्व विभागाच्या मान्यतेनंतर लगेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. - सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड

logo
marathi.freepressjournal.in