गुगल मॅपवर रिव्ह्यूसाठी पैशाचे आमिष

पैसे मिळवण्याऐवजी त्या युवकाची ३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
गुगल मॅपवर रिव्ह्यूसाठी पैशाचे आमिष
Published on

नवी मुंबई : गुगल मॅपवर रिव्ह्यू द्या आणि प्रति रिव्ह्यू१५० रुपये कमवा, असा संदेश सध्या अनेकांना येत आहे. कामोठे येथे राहणाऱ्या एका युवकाने भरपूर पैसे मिळतील, या अपेक्षेने काम सुरू केले; मात्र पैसे मिळवण्याऐवजी त्या युवकाची ३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून, सायबर विभाग पुढील तपास करीत आहे. कामोठे येथे राहणारे विश्वजीत कोळेकर यांच्या मोबाईलवर ६ डिसेंबरला संदेश आला. त्यात प्रति रिव्ह्यू १५० रुपये मिळतील, असे नमूद करण्यात आले होते. तसेच एक गुगल लिंक देण्यात आली होती. ती लिंक उघड करून त्यात रिव्ह्यू लिहून स्क्रीनशॉट पाठवा, असे सांगण्यात आले. तसेच स्क्रीनशॉट पाठवल्यावर कंपनीच्या स्वागतिका यांच्याशी टेलिग्रामवर संपर्क करण्यास सांगितले. त्याची लिंकही देण्यात आली, त्याप्रमाणे विश्वजीत यांनी रिव्ह्यू देत त्याचा स्क्रीनशॉट पाठवला. त्यानंतर विविध कारणे देत मागणी केल्या प्रमाणे १० हजार ते ५० हजार असे ९ वेळा पैसे एकूण ३ लाख ६५ हजार रुपये पाठवण्यात आले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर विश्वजीत यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in