नवी मुंबईत शिवसेनेच्या वतीने भव्यदिव्य रोषणाई

ढोल ताशांच्या गजरात व भाविकांकडून दीप लावून प्रभू श्रीराम यांना अभिवादन केले जाणार आहे.
नवी मुंबईत शिवसेनेच्या वतीने भव्यदिव्य रोषणाई
Published on

नवी मुंबई : अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने तसेच शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने भव्यदिव्य रोषणाईची आरास केली जाणार आहे. तसेच ढोल ताशांच्या गजरात व भाविकांकडून दीप लावून प्रभू श्रीराम यांना अभिवादन केले जाणार आहे.

अयोध्यापती प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी जाणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याच्या निमित्ताने विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून प्रभू श्रीराम यांना अभिवादन केले जाणार आहे. नवी मुंबई जिल्हा शिवसेनेच्या वतीने देखील रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने तसेच वंदनीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाविकांना प्रभू श्रीराम यांच्याचरणी नतमस्तक होऊन अभिवादन करता यावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे २१ जानेवारी आणि २२ जानेवारी हे दोन दिवस भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आकर्षक चौरंगी विद्युत रोषणाई केली जाणार आहे. सदर ठिकाणी फुलांच्या सजावटीत प्रभू श्रीराम आणि सीतामाई तसेच रामभक्त हनुमान यांचे १२ फूट उंचीचे पुतळे भाविकांना दर्शनासाठी विराजमान केले जाणार आहेत. २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रभू श्रीराम यांची विधिवत पूजा केली जाणार आहे. प्रभू श्रीराम यांच्या भजन-कीर्तनाचे ध्वनीस्वर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिवसभर गुंजणार आहेत. भाविकांना प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेण्याची व फुले वाहण्याची सुविधा याठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे.

२२ जानेवारी रोजी सायंकाळी ‘तेजवूया एक दिवा प्रभू श्री राम यांच्या चरणी’ या उपक्रमांतर्गत येणाऱ्या भाविकांच्या हस्ते दिवे प्रज्वलन केले जाणार आहेत. तसेच सायंकाळपासून ढोल-ताशांच्या गजरात प्रभू श्रीराम यांना अभिवादन केले जाणार आहे. तसेच भाविकांना प्रसाद वाटप केले जाणार आहे.

- किशोर पाटकर ( आयोजक, शिवसेना संपर्कप्रमुख)

logo
marathi.freepressjournal.in