नवी मुंबईत गुटख्याचा साठा करणाऱ्यास अटक

टिंन्टो वॅगन कार जप्त करून गुटख्याचा साठा करुन ठेवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबईत गुटख्याचा साठा करणाऱ्यास अटक

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने घणसोली सेक्टर-१ मधील एका रो-हाऊसवर छापा मारून सुमारे सव्वा ४ लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. तसेच गुटख्याचा साठा वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी टिंन्टो वॅगन कार जप्त करून गुटख्याचा साठा करुन ठेवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या कारवाई दरम्यान पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या दुकलीने सदर गुटख्याचा साठा कुठून आणला याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

घणसोली सेक्टर-१ मधील

रो-हाऊसमध्ये तळमजल्यावरील घरामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे व त्यांच्या पथकाने गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या सुचनेनुसार गत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घणसोली सेक्टर-१ मधील संशयीत रो-हाऊसवर छापा मारला.

सदर रो-हाऊसच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमधून दोन व्यक्ती भरलेल्या गोण्या रो-हाऊसमध्ये ठेवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पकडलेल्या नदीम अहमद शकील अहमद (२८) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गोण्यांमध्ये असलेल्या वस्तूबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी त्याच्या घरात असलेल्या गोण्या व कारमध्ये असलेल्या गोण्यांची तपासणी केली असता, त्यात सुमारे सव्वा चार लाख रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचे पाकिटे व सुगंधित सुपारीचा माल असल्याचे आढळून आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in