नवी मुंबईतून दीड लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक

घरामध्ये ९ गोण्यांमध्ये भरून ठेवण्यात आलेला सुमारे दीड लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसल्याचा साठा आढळून आला.
नवी मुंबईतून दीड लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शनिवारी रात्री ऐरोली सेक्टर-१ मधील एका घरावर छापा मारून विक्रीकरीता साठवून ठेवलेला सुमारे दीड लाख रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे. तसेच सदर गुटखा व पानमसाल्याचा साठा ठेवणाऱ्या आशिशकुमार गुप्ता (२३), धीरजकुमार गुप्ता (२८) व राहुलकुमार गुप्ता या तिघांना अटक करण्यात आली आहे.

ऐरोली सेक्टर-१ मधील खोली नं. १४९५ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा-विक्री करण्यासाठी अवैधरित्या साठवणूक करून ठेवण्यात आल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती.

सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप मोरे व त्यांच्या पथकाने शनिवारी संशयीत घरावर छापा मारला. यावेळी सदर घरामध्ये ९ गोण्यांमध्ये भरून ठेवण्यात आलेला सुमारे दीड लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसल्याचा साठा आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आशिशकुमार गुप्ता, धीरजकुमार गुप्ता व राहुलकुमार गुप्ता या तिघांसह त्यांचा मालक त्रिभुवन कश्यप या चौघांविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in