ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना; उच्च शिक्षण घेणाऱ्या व्हिजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना सुरू

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी इतर मागास प्रवर्गासाठी ५९ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी ३४ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी ६ टक्के, तसेच अनाथ करिता १ टक्के, असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना; उच्च शिक्षण घेणाऱ्या व्हिजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना सुरू

नवी मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित जिह्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयात सहाय्यक संचालकांकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी इतर मागास प्रवर्गासाठी ५९ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी ३४ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी ६ टक्के, तसेच अनाथ करिता १ टक्के, असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असणे तसेच तो महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सक्षम प्राधिकाऱयाने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे, तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती साठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहणार आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या अथवा तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा, अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली असून, उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई विभागातील सहाय्यक संचालक मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधवा.

-वंदना कोचुरे, प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई विभाग

'या' आहेत अटी

या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी १२वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान ६० टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन अथवा सीजीपीए गुण असणे आवश्यक राहणार आहे. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी इयत्ता १२ वीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाणार आहे. सदर योजनेतंर्गत एकूण प्रवेश संख्येच्या ७० टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व ३० टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निकष ठेवण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता

आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना बँक खात्यात वितरीत करण्यात येणारी रक्कम मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ६० हजार रुपये भोजन, निवास व निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५१ हजार रुपये त्याचप्रमाणे इतर जिह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४३ हजार रुपये, तर तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३८ हजार रुपये भोजन, निवास व निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in