वाढत्या उन्हाचा वाहतूक पोलिसांना फटका; वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना उडतेय तारांबळ

सध्या उन्हाचा पारा हा ४० अंशाच्या वर पोहोचल्याने या उन्हाच्या झळा सहन करत अनेकांना आपापली कामे करावी लागत आहेत.
वाढत्या उन्हाचा वाहतूक पोलिसांना फटका; वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना उडतेय तारांबळ

नंदकुमार ठाकूर /नवी मुंबई

सध्या उन्हाचा पारा हा ४० अंशाच्या वर पोहोचल्याने या उन्हाच्या झळा सहन करत अनेकांना आपापली कामे करावी लागत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक दुपारचे बाहेर पडण्यास टाळत असले तरी वाहतूक पोलिसांना मात्र भर उन्हामध्ये रस्त्यावर, चौकात उभे राहून वाहतुकीचे नियमन करावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना उन्हाचा चांगलाच फटका बसत आहे. वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी भर उन्हात उभे रहावे लागत असल्याने सध्या त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.

नागरिकांमधून वाहतूक पोलिसांवर नेहमीच टीका होत असते, मात्र असे असले तरी वाहतूक पोलिसांना नागरिकांच्या सोयीसाठी ऊन असो वा पाऊस त्यांना रस्त्यावर उभे राहूनच वाहतुकीचे नियमन करावे लागते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सकाळी दहापासूनच उन्हाचा पारा वाढू लागल्याने नागरिकांकडून घराबाहेर पडणे टाळले जात आहे. मात्र वाहतूक पोलिसांना या उन्हाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील दोन्ही परिमंडळाच्या हद्दीत चौका-चौकात, महामार्ग व महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे नियमन करण्यासाठी उभे रहावे लागते.

त्याचप्रमाणे अंतर्गत भागात गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक पोलिसांच्या ड्यूट्या नेमून दिल्या गेल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी हजर रहावे लागत आहे. मात्र यातील बहुतांश चौकांमध्ये वाहतूक पोलिसांना उभे राहण्यासाठी सावलीच नसल्याने बहुतेक पोलिसांना उन्हामध्ये उभे राहून आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे. यामुळे महिला वाहतूक पोलिसांसह पुरुष वाहतूक पोलिसांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे.

वाहतूक पोलिसांना चौकामध्ये उभे राहण्यासाठी काही वर्षापूर्वी स्वयंसेवी संस्था व काही कंपन्यांकडून ट्रॅफिक बूथ दिले गेले होते. मात्र पूर्वी असलेले बहुतांश पोलीस बूथ सध्या गायब झाले आहेत. सध्या ट्रॅफिक बूथ देण्यासाठी कुठल्याच संस्था व कंपन्या पुढे येत नसल्याचे एका वाहतूक पोलिसाने सांगितले. त्यामुळे वाहतूक पोलिसांसाठी चौका-चौकांमध्ये ट्रॅफिक बूथ उभारण्याची आवश्यकता असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

सतत उन्हात उभे राहिल्याने अनेक वेळा चक्कर येण्याचे प्रकार घडत आहेत. त्याशिवाय उन्हामुळे त्वचेचे आजार देखील काहींना जडले आहेत. वाहतूक पोलिसांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसल्याने त्यांच्यात इतर आजारांचे प्रमाण देखील वाढत असल्याचे एका वाहतूक पोलिसाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. वाहतूक पोलिसांकडून नियम तोडणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याने वाहतूक पोलिसांवर नेहमी टीका केली जाते. मात्र उन्हा-तान्हात कर्तव्यावर काम करत असताना, एखादा वाहनचालक पाणी पाजण्याचे सौजन्य देखील दाखवत नाहीत, अशी खंत देखील या वाहतूक पोलिसाने व्यक्त केली.

रस्त्यावर अपघात झाल्यास, सगळ्यात पहिला धावून जातो तो वाहतूक पोलीस तोच अपघातातील जखमींना, मृतांना उचलून रुग्णालयात नेतो. त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला देखील तोच सामोरे जात असतो. नेहमी रस्त्यावर उभा असणारा हा वाहतूक पोलीस सणासुदीला आनंदाच्या क्षणी आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे वाहतूक पोलीस सुद्धा एक माणुसच आहे, हे नागरिकांकडून विसरले जाते, वाहतूक पोलीस कारवाई करतो म्हणून नागरिकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा नकारात्मक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलण्याची आवश्यकताही एका वाहतूक पोलिसाने बोलून दाखवली.

कायम दक्ष रहावे लागते

नवी मुंबईतून मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन महत्त्वाचे महामार्ग जात असल्याने या महामार्गावरून नेहमी व्हीआयपी व्यक्तींची येजा सुरू असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कायम अलर्ट रहावे लागते. तसेच या दोन्ही महामार्गावर कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. त्यामुळे वाहतूक पोलिसांना ऊन असो वा पाऊस कायम दक्ष रहावे लागते, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका वाहतूक पोलिसाने सांगितले.

वाहतुकीच्या नियमनासाठी रस्त्यावर अथवा चौकात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांचे तळपत्या उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एखाद्या पॉईंटवर कर्तव्यावर असलेल्या दोन अंमलदारांना आलटूनपालटून वाहतूक नियमन करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रत्येक वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. ५० पेक्षा अधिक वय असलेल्या तसेच काही आजरपण असलेल्या अंमलदारांना वाहतूक नियमनास न पाठविण्याबाबत देखील सूचना करण्यात आल्या आहेत. - तिरुपती काकडे (पोलीस उपआयुक्त नवी मुंबई वाहतूक विभाग)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in