पावसामुळे एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याचे मोठे नुकसान

अचानक आलेल्या पावसाने बाजार आवारात गाळ्यांबाहेर पाणी साचले होते. त्यामुळे गाळ्या बाहेर विक्रीसाठी ठेवलेले कांदे भिजले
पावसामुळे एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याचे मोठे नुकसान

नवी मुंबई शहरात गुरुवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळित केले असताना नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मात्र पावसामुळे मालाचे मोठे नुकसान झाले. कांदा बटाटा बाजारात अचानक आलेल्या पावसामुळे कांदे भिजले. यामुळे विक्रीसाठी व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला तर बराच माल फेकून द्यावा लागल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

एपीएमसी मार्केटमध्ये प्रतिदिन हजारो नागरिक ये जा करतात. कोटींची उलाढाल असलेल्या एपीएमसी बाजारात वातावरणातील बदलामुळे मालाच्या दरात मागील काही दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत होते. तर दुसऱ्या बाजूला गुरुवारी दुपारनंतर आलेल्या पावसाचा फटका साठवलेल्या मालाला बसला. यामध्ये भाजीपाल्यासोबत कांदा बटाटा मालाचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने बाजार आवारात गाळ्यांबाहेर पाणी साचले होते. त्यामुळे गाळ्या बाहेर विक्रीसाठी ठेवलेले कांदे भिजले. ऐनवेळी पावसाने धुमाकूळ घातल्याने भिजलेले कांदे उचलण्यासाठी व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. आधीच बाजारात मोठया प्रमाणावर खराब कांदे दाखल होत असून त्यात पावसाने भिजल्याने कांद्याचे नुकसान झाले असल्याची माहिती व्यापारी सुरेश शिंदे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in