नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मनोज जरांगे-पाटील यांची पायी पदयात्रा २५ जानेवारी रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणार आहे. या पदयात्रेसोबत मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांनाचा ताफा येणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २५जानेवारी रोजी रात्री १२ ते २६ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश करण्यास, वाहने उभी करण्यास तसेच शहरातील सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मनोज जरांगे-पाटील यांनी २० जानेवारीपासून जालना ते मुंबई अशी पायी पदयात्रा सुरू केली आहे. त्यांच्या पदयात्रेसोबत मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचा ताफा आहे. सदरची पदयात्रा २५ जानेवारी रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणार असून, या पदयात्रेचा एका दिवसाचा मुक्काम देखील नवी मुंबईच्या हद्दीत होणार आहे. या पदयात्रेसोबत मार्गस्थ असलेली वाहने तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील अंतर्गत रस्त्यावरील वाहनांच्या वाहतुकीचे व पार्किंगचे नियोजन योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर दिवशी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रोड बंदोबस्त, पार्किंग नियोजन व सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थापन करण्यात येणार आहे. सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, सदर कार्यकमाचे अनुषंगाने येणारी वाहने, प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू असणार नाही.