मुंबईकरांची ‘हेरिटेज वेळ’! वेळेचे पालन अन् गेलेली वेळ पुन्हा येणे नाही!

१५० किलो वजन, १३५ वर्षांपासून मुंबईला दाखवतेय वेळ
मुंबईकरांची ‘हेरिटेज वेळ’! वेळेचे पालन अन् गेलेली वेळ पुन्हा येणे नाही!
Published on

मुंबई: वेळेची किंमत प्रत्येक मुंबईकर जाणून असतो. त्यामुळेच घड्याळाच्या काट्यावर धावणारा मुंबईकर दिवस असो वा रात्र वेळेत आपले स्थळ गाठण्यासाठी सदैव पळत असतो. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी स्थानक. या स्थानकात रोज लाखो प्रवाशांची ये-जा सुरू असते. घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईला गेल्या १३५ वर्षांपासून वेळ दाखवण्याचे काम सीएसएमटी इमारतीवरील विशाल टॉवर क्लॉक करतेय. सीएसएमटी स्थानक व विविध रेल्वे कार्यालयात २६ ब्रिटीशकालीन घड्याळे आहेत. ही हेरिटेज घड्याळे आजही मुंबईला वेळ दाखवत आहेत. त्यामुळे वेळेची किंमत करा कारण वेळ कधीच कोणाची वाट पाहत नाही अन् गेलेली वेळ पुन्हा येत नाही.

मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकापैकी सीएसएमटी स्थानक एक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आजही २६ हेरिटेज घड्याळे कार्यरत आहेत, त्या सर्वांत प्रतिष्ठित (आयकॉनिक) ९ फूटांचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्यवर्ती घड्याळ आहे. मध्य रेल्वेच्या हेरिटेज घड्याळांचे संकलन रेल्वे वाहतुकीसाठी वेळेचे महत्त्व विषद करते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये २६ हेरिटेज घड्याळे यांत्रिकरित्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या हेरिटेज घड्याळांची देखभाल करण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आजही २६ ब्रिटिशकालीन हेरिटेज घड्याळे मुंबईला अचूक वेळ दाखवण्याचे काम करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज बिल्डिंग घड्याळ १८८८ मध्ये ही कलाकृती तयार करणाऱ्या ब्रिटिश टाइमकीपर्सच्या कारागिरीतील उत्कृष्टतेचे उदाहरण आहे. हे घड्याळ गेल्या १३५ वर्षांपासून मुंबईला वेळ दाखवत आहे. नऊ फूट व्यासाचे हे यांत्रिक घड्याळ आहे. १५० किलो वजनाचे लोखंडी साखळीने उचललेल्या लोखंडी स्पिंडलवर जोडलेले असून ज्यामध्ये गाइडिंग व्हील, पुली आणि गिअर सिस्टिम आहे. १५० किलो वजन हे मुख्य चकती चालवते, ज्यामुळे रिडक्शन गिअर्सच्या मदतीने घड्याळाचे काटे त्यानुसार चालतात. काटे तांब्याचे बनलेले आहेत. घड्याळाचा फ्रंट पॅनल पारदर्शक वैशिष्ट्य राखण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी दिसण्यासाठी ॲॅक्रेलिक शीटचे बनलेले आहे. तसेच ५ मर्क्युरी लाइट बल्बने प्रकाशित केले आहे. यातील मुख्य चकतीच्या स्पिंडलवर काट्यांच्या मदतीने, टांगलेल्या वजनाची उंची संतुलित करण्यासाठी गुंडाळलेल्या लोखंडी साखळी आहेत. आठवड्यातून यांना एकदा फिरवणे आवश्यक आहे, ज्याला घड्याळाची चावी फिरवणेदेखील म्हणतात. या घड्याळाच्या नियमित देखभालीमध्ये प्रत्येक भागाला तेल लावणे, ग्रिसींग करणे समाविष्ट आहे.

दोन महाकाय घड्याळ लोकल ट्रेनच्या प्रवाशांना वेळेचे महत्त्व दर्शवितात. प्लॅटफॉर्म क्रमांक २-३ आणि ४-५ येथे असलेल्या या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून जाणाऱ्या लाखो उपनगरीय प्रवाशांना वेळ दाखवणारे हे घड्याळ आहे. १९२५ च्या आसपास ज्यावेळी इलेक्ट्रिक ट्रेन सुरू झाल्या, त्याच वेळी स्थापित असलेल्या या घड्याळ्यांचा व्यास ११ फूट आहे. सिंगल पल्स सिस्टिमद्वारे चालणाऱ्या दोन घड्याळाच्या उपस्थितीवरून हे नाव पडले आहे. हे घड्याळ इलेक्ट्रोमेकॅनिकल ऑपरेशनवर आधारित आहे. हे इनपूट म्हणून २३० व्ही एसी घेते आणि ते २२० व्हीडीसीमध्ये रूपांतरित करते. या व्होल्टेजचा उपयोग प्रत्येक ३० सेकंदानंतर विद्युत पल्स निर्माण करण्यासाठी केला जातो. या पल्सचा उपयोग घड्याळाचे काटे हलविण्यासाठी केला जातो. घड्याळाच्या पुढील पॅनेलमध्ये ॲॅक्रेलिक शीट आणि त्यामागे मर्क्युरी बल्ब रात्रीच्या वेळी बॅकलाइटच्या उद्देशाने सुसज्ज आहे. त्याच्या नियतकालिक देखभालीमध्ये घड्याळाच्या वेगवेगळ्या भागांना जसेकी चाक, पुली, गिअर्स इ. तेल लावणे आणि ग्रिसिंग करणे असते. हे घड्याळ या प्लॅटफॉर्मच्या बांधकामापासून स्थापित केलेले असावे.

२६ घड्याळांपैकी ४ घड्याळ्याचे प्रकार व आकारमानात भिन्नता

* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज बिल्डिंग मध्यवर्ती घड्याळ

* स्टार चेंबर मिनी टॉवर घड्याळ

* प्लॅटफॉर्म क्र. २ व ३ आणि ४ व ५ दरम्यानचे संयुक्त २ घड्याळे

* जॉन वॉकर - २३ घड्याळे

‘मिनी टॉवर घड्याळ’

‘मिनी टॉवर’ हे घड्याळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज बिल्डिंग वर असलेल्या घड्याळ्यासारखेच आहे. या घड्याळाचा व्यास ३.२८ फूट किंवा १ मीटर आहे. हे वजनावर आधारित, यांत्रिक घड्याळ आहे. हे घड्याळ स्टार चेंबर येथे आहे. या घड्याळात ५० किलो वजनाची मुख्य चकती आणि दोन पुलीवर आधारित गिअर प्रणाली आहे.

‘जॉन वॉकर’ घड्याळ

‘जॉन वॉकर घड्याळ’ पूर्णपणे यांत्रिक, वजनावर आधारित पेंडुलम घड्याळ आहे. ५ किलो वजनाचे असून, चकतीच्या स्पिंडलला गाइड करतो, ज्यामुळे घड्याळाचे काटे फिरतात. हे वजन सतत खाली जात राहते, जे दर ३ दिवसांनी अथवा अधिक अचूकपणे ७५ तासांनी समायोजित करणे आवश्यक आहे. रेल्वेत १९०७ ते १९१० या वर्षांत या घड्याळांची स्थापना केली असावी, असे मानले जाते. येथे वारसामूल्य प्रतिबिंबित करणारे आणि वेळेचे महत्त्व दर्शवणारे २३ हेरिटेज घड्याळे विविध अधिकारी कक्षात कार्यरत आहेत.

गेलेला काळ प्रतिबिंबित

हे महाकाय हेरिटेज घड्याळ मुंबईकरांना रेल्वेच्या कामकाजासाठी वेळ महत्त्वाची आहे, याची आठवण करून देते. त्यात गेलेला काळही प्रतिबिंबित होतो. शतकापूर्वी, क्वचितच कोणी घड्याळे घालत असत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील या महाकाय घड्याळ्याने मुंबईकरांना वेळेचे पालन करण्याचा मार्ग आणि गेलेली वेळ कोणाचीही प्रतीक्षा करीत नाही, हेच दर्शवण्याचे काम ब्रिटीशकाळापासून केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in