रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा! रिक्षामध्ये राहिलेला लॅपटॉप महिलेला केला परत

महिलेला रिक्षातून महापे येथे सोडल्यानंतर तो रिक्षा घेऊन जेवण्यासाठी घरी गेला. त्यानंतर तो रिक्षाची साफसफाई करताना, रिक्षाच्या पाठीमागील भागात लॅपटाप राहिल्याचे त्याच्या लक्षात आले...
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा! रिक्षामध्ये राहिलेला लॅपटॉप महिलेला केला परत

नवी मुंबई : कोपरखैरणे ते महापे एमआयडीसी प्रवासादरम्यान रिक्षामध्ये विसरलेला महागडा लॅपटॉप संबंधित महिला प्रवाशाला परत करण्याचा प्रामाणिकपणा कोपरखैरणेतील रिक्षाचालक संदीप साळुंखे (फौजी) याने दाखवला आहे. त्यामुळे या रिक्षाचालकाचे कौतुक होत आहे.

कोपरखैरणे सेक्टर-१५ मध्ये राहणारी एक महिला गत बुधवारी दुपारी कोपरखैरणेतील शिवशंभो रिक्षा स्टँडवरून संदीप साळुंखे (फौजी) याच्या रिक्षातून महापे एमआयडीसीतील कंपनीत गेली होती. यावेळी रिक्षामधुन उतरताना सदर महिला आपला लॅपटॉप रिक्षामध्ये विसरून गेली होती. कंपनीत गेल्यानंतर काही वेळाने तिला आपला लॅपटॉप रिक्षामध्ये राहिल्याचे लक्षात आले. त्यानंतर या महिलेने पुन्हा कोपरखैरणेतील शिवशंभो रिक्षा स्टँड गाठून तेथील रिक्षाचालकांना आपल्या लॅपटॉपबाबत माहिती दिली. त्यानंतर तेथील रिक्षाचालकांनी आपल्या स्टँडवरील व इतर रिक्षाचालकांच्या व्हॉट्सॲपवर लॅपटॉप विसरल्याची माहिती टाकली.

दरम्यान, फौजी याने महिलेला रिक्षातून महापे येथे सोडल्यानंतर तो रिक्षा घेऊन जेवण्यासाठी घरी गेला. त्यानंतर तो रिक्षाची साफसफाई करताना, रिक्षाच्या पाठीमागील भागात लॅपटाप राहिल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने सदर लॅपटॉप व्यवस्थित काढून ठेवला. त्यानंतर तो पुन्हा रिक्षा स्टँडवर गेल्यानंतर त्याला रिक्षामध्ये एका महिलेचा लॅपटॉप राहिल्याची माहिती इतर रिक्षाचालकांकडून त्याला समजली. त्यानंतर फौजी याने रिक्षा स्टॅन्डचे अध्यक्ष नाना प्रकाश भाऊ व सतीश पाटील यांच्या उपस्थितीत सदर महिलेला तिचा लॅपटॉप परत दिला. रिक्षाचालक संदीप साळुंखे याने प्रामाणिकपणे सदर महिलेचा लॅपटॉप सुस्थितीत परत दिल्याने सदर महिलेने संदीप साळुंखे (फौजी) याचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in