पत्नी बहिणीकडे राहण्यास येत नसल्याचा राग, बायको झोपेत असतानाच पतीने चेहऱ्यावर टाकले ॲसिड; झाली अटक

या प्रकरणातील जखमी विवाहितेचे नाव अमिना खातुन उर्फ अमिन बिबी रमजान गाझी (२८) असे असून ती मूळची पश्चिम बंगाल राज्यातील आहे.
पत्नी बहिणीकडे राहण्यास येत नसल्याचा राग, 
बायको झोपेत असतानाच पतीने चेहऱ्यावर टाकले ॲसिड; झाली अटक

नवी मुंबई : पत्नी, बहिणीकडे राहण्यास येत नसल्याच्या रागातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून तिचा चेहरा जाळल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल तालुक्यात उघडकीस आला आहे. रमजान सिद्धिकी गाझी (२८) असे या पतीचे नाव असून पनवेल तालुका पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गत २० जानेवारी रोजी पहाटे ही घटना घडली असून यात गंभीररित्या भाजलेली विवाहिता सध्या पश्चिम बंगाल येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.

या प्रकरणातील जखमी विवाहितेचे नाव अमिना खातुन उर्फ अमिन बिबी रमजान गाझी (२८) असे असून ती मूळची पश्चिम बंगाल राज्यातील आहे. सध्या ती पतीसह मोलमजुरी करून पनवेल तालुक्यातील वावंजे येथील खैरणे गावात रिझवान कंपनीजवळ राहत होती. अमिना खातुनचा पती रमजान सिद्धिकी गाझी (२८) याची बहिण हैदराबाद येथे राहण्यास असून या बहिणीकडे राहण्यास जाण्यासाठी रमजानने पत्नी अमिना खातुनच्या पाठीमागे गेल्या काही दिवसांपासून तगादा लावला होता. मात्र अमिना खातुनने हैदराबाद येथे जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे गत महिन्यामध्ये या दोघा पती-पत्नीमध्ये अनेकवेळा भांडणसुद्धा झाले होते. गत १९ जानेवारी रोजी रात्री देखील या पती-पत्नीमध्ये याच गोष्टीवर भांडण झाले होते. त्यामुळे रमजान याने या गोष्टीचा राग मनामध्ये धरुन २० जानेवारी रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अमिना खातुन ही गाढ झोपेमध्ये असताना तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकले.

यात अमिना खातुनचा चेहरा गंभीररीत्या भाजल्याने तीने येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन पश्चिम बंगाल येथील माहेर गाठले. अमिना खातुन हिला तिच्या कुटुंबीयांनी कोलकाता येथील एन.सी.एम.सी. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. त्यानंतर तेथील बनियापुकूर पोलिसांनी अमिना खातुनचा जबाब नोंदवून झीरो नंबरनुसार याबाबतचा गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा पनवेल तालुका पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in