महाविद्यालयासाठी सर्वतोपरी मदत करेन -खासदार गावित, खासदार निधीतून महाविद्यालयास ४० संगणकांची भेट

महाविद्यालयासाठी सर्वतोपरी मदत करेन -खासदार गावित, खासदार निधीतून महाविद्यालयास ४० संगणकांची भेट

राजेंद्र गावित खासदार म्हणाले, माझ्या मतसंघात समाविष्ट असलेल्या या महाविद्यालयासाठी मी नेहमीच सर्वतोपरी मदत करेन.

वसई : ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सत्पाळा विरार पश्चिम यांच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळ्यास पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या पनवेल विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप हे निमंत्रित पाहुणे आणि सीनिअर ॲड. जॉन रुमाव विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस तुस्कानो आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डोंगरे यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राजेंद्र गावित खासदार म्हणाले, माझ्या मतसंघात समाविष्ट असलेल्या या महाविद्यालयासाठी मी नेहमीच सर्वतोपरी मदत करेन. दूरदृष्टी असणारे ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस तुस्कानो अनेक छोट्या मोठ्या समस्यांना सामोरे जाऊन महाविद्यालयाचा डोलारा अतिशय उत्तमरीत्या संभाळत आहेत आणि विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधत आहेत. पुढे त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यां आणि मेहनती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा तोंडभरून कौतुक केले.

पनवेल विभागाचे मुंबई विद्यापीठाचे सहसंचालक डॉ. संजय जगताप निमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ संजय जगताप म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अधिकाधिक प्रयत्न करायला हवेत. नवीन शैक्षणिक धोरणात इंटर्नशिप, प्लेसमेंट आणि सर्वांगीण विकास यावर भर दिला आहे, याचा विचार करून महाविद्यालयाने आता पासूनच पावले उचलली पाहिजेत. वरिष्ठ ॲड. जॉन रुमाव यांनी आपल्या भाषणात परदेशी विद्यापीठांचे महत्त्व सांगितले आणि आपले उपक्रम परदेशी विद्यापीठांच्या तोडीचे असणे आवश्यक आहे, असेही मत मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डोंगरे आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या स्नेहल कवळी यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

मान्यवर पाहुण्यांची ओळख करून त्यांचे स्वागत करण्याची जबाबदारी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोजा यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस तुस्कानो यांनी खासदार निधीतून महाविद्यालयास ४० संगणक दिल्याबद्दल खासदार राजेंद्र गावित यांचे विशेष आभार मानले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

खासदार निधीतून देण्यात आलेल्या संगणक प्रशालेचे उद्घाटन देखील खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. सहाय्यक प्राध्यापक जगदीश संसारे आणि प्राध्यापिका राणी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्राध्यापिका दक्षता पाटील यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.

logo
marathi.freepressjournal.in