नवी मुंबई : दारूच्या आहारी गेलेला व आई-वडील व तीन बहिणींना सतत मारहाण करणाऱ्या व्यसनी भावाचा बहिणीसोबत झालेल्या झटापटीत मृत्यू झाल्याची घटना ऐरोलीत उघडकीस आली आहे. शैलेश रामचंद्र सोरटे (३४) असे या मृत भावाचे नाव असून त्याच्या मृत्यूनंतर तो दारू पिऊन नशेत कुठेतरी पडून जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशी खोटी माहिती शैलेशच्या बहिणींनी पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात बहिणीसोबत झालेल्या झटापटीत शैलेश जखमी झाल्यामुळे त्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी शैलेशची मोठी बहीण ज्योती सोरटे (३६) हिच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
शैलेश सोरटे हा ऐरोली सेक्टर-१७ मधील अस्मिता सोसायटीमध्ये आई कुसुम सोरटे, बहिणी नीता सोरटे, ज्योती सोरटे व शिल्पा सोरटे यांच्यासह राहत होता. शैलेश काहीही कामधंदा करत नव्हता. तसेच त्याला दारूचे व्यसन लागल्याने रोज दारू पिऊन आल्यानंतर तो आपल्या आई-वडिलांना तसेच तिन्ही बहिणींना अमानुषपणे मारहाण करत होता. अशा परिस्थितीत देखील शैलेशच्या तिघी बहिणी मिळेल ते काम करून त्याच्यासह आई-वडिलांचा सांभाळ करत होत्या. त्यानंतर देखील शैलेश दररोज दारू पिऊन आल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करत होता. वडिलांच्या मृत्यूनंतरही शैलेशच्या वागण्यात कोणताही फरक पडला नव्हता.
११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास शैलेश नेहमीप्रमाणे दारू पिऊन आल्यानंतर त्याने वडिलांच्या फोटोसमोर मटणाच्या जेवणाचा नैवेद्य ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यास आईने विरोध केल्याने त्याने आईला मारहाण केली. यावेळी आईला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या तिघी बहिणींना देखील त्याने बेदम मारहाण केली. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास शैलेश जेवायला बसल्यानंतर त्याने पुन्हा बहिणींसोबत वाद घातला. यावेळी त्याने मोठी बहीण ज्योती हिच्या अंगावर धावून जात तिला मारहाण केली. त्यामुळे अन्य दोन बहिणी ज्योतीला सोडविण्यासाठी पुढे आल्या असता त्यांनाही शैलेशने मारहाण केली. शैलेशची मारहाण असह्य झाल्याने ज्योतीने स्वत:ला सोडविण्यासाठी लोखंडी पकडीने शैलेशच्या तोंडावर, कपाळावर फटके मारले. तरीही शैलेश शिल्पा व नीता यांना मारण्यासाठी अंगावर धावून गेल्याने ज्योतीने पुन्हा शैलेशच्या डोक्यात पकडीचे दोन-तीन फटके मारले. त्यानंतर तो खाली पडल्यानंतर तिघी बहिणी पहाटे ४ च्या सुमारास बेडरूममध्ये गेल्या. शैलेश निपचीत पडल्याने या तिन्ही बहिणींनी सकाळी ६ च्या सुमारास त्याला प्रथम ऐरोली येथील खासगी रुग्णालयात त्यानंतर त्याला वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शैलेशच्या मृत्यूनंतर त्याच्या बहिणींनी शैलेश हा दारूच्या नशेत कुठेतरी पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्यात तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला असावा, अशी खोटी माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार रबाळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून या प्रकरणाचा तपास केल्यानंतर ज्योतीसोबत झालेल्या झटापटीत तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.