पोलीस भरतीत पावसाचे विघ्न, भरती प्रक्रिया दोन दिवस पुढे ढकलली

मंगळवार रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कळंबोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर चिखल झाल्याने नवी मुंबई पोलिसांना पोलीस भरती सुरू करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
पोलीस भरतीत पावसाचे विघ्न, भरती प्रक्रिया दोन दिवस पुढे ढकलली
Published on

नवी मुंबई : मंगळवार रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कळंबोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर चिखल झाल्याने नवी मुंबई पोलिसांना पोलीस भरती सुरू करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. भरतीच्या पहिल्याच दिवशी पावसाचे विघ्न आल्याने ही पोलीस भरती दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे नवी मुंबई पोलिसांनी जाहीर केले आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून १८५ पोलीस शिपाई पदांसाठी बुधवारपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती. मात्र बुधवारी पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. मैदान सुस्थितीत नसल्याने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी बुधवारी सकाळी मैदानाची पाहणी केल्यानंतर सदरची भरती प्रक्रिया पुढील दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार नवी मुंबई पोलीस दलाची १९ व २० जून रोजी होणारी मैदानी चाचणी २३ जूनला सूरू होणार आहे. तसेच २१ व २२ जून रोजी होणारी उमेदवारांची मैदानी चाचणी २७ जून रोजी घेण्याचा निर्णय नवी मुंबई पोलिसांनी घेतला आहे.

याबाबतची माहिती पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना संकेतस्थळावरून तसेच उमेदवारांच्या मोबाईल फोनवरून कळविण्यात येणार आहे.

कळंबोलीतील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर बुधवारी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने पोलीस मुख्यालयातील मैदान चाचणीसाठी सुस्थितीत नसल्याने पोलीस भरती प्रक्रिया दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. मैदानी चाचणी घेण्यासाठी मैदानावर शंभर मीटर छत बांधण्यात येणार आहे. त्यानंतर २३ पासून पोलीस भरतीची मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. जे उमेदवार इतर ठिकाणी मैदानी चाचणीसाठी जातील, अशा उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे.

- संजयकुमार पाटील (पोलीस उपआयुक्त मुख्यालय)

logo
marathi.freepressjournal.in