नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर; पंतप्रधानांचा ३० ऑक्टोबरचा संभाव्य दौरा रद्द

नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी एकाच महिन्यात पंतप्रधानांच्या चारवेळा तारखा जाहीर करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर; पंतप्रधानांचा ३० ऑक्टोबरचा संभाव्य दौरा रद्द

नवी मुंबई : येत्या ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पुन्हा अनिश्चित कालावधीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी एकाच महिन्यात पंतप्रधानांच्या चारवेळा तारखा जाहीर करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान कार्यालयाकडून 'तारीख पे तारीख' दिली जात असल्यामुळे राज्य शासनासह सिडको व जिल्हाधिकारी रायगड कार्यालयातील अधिकारी हवालदिल झाले आहेत.

येत्या ३० ऑक्टोबर रोजी नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी व नमो महिला सशक्तीकरण अभियानाच्या शुभारंभानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाव्य नवी मुंबई दौरा घोषित करण्यात आला होता. तशा सुचना सिडको व जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यात आल्यामुळे या दोन्ही कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी नवी मुंबईतील विविध शासकीय प्राधिकरणांकडून सुरू झाली होती.

सिडको व्यवस्थापनाने नवी मुंबई मेट्रो व नमो महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमाकरीता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर एक लाख महिला उपस्थित राहतील, असे गृहित धरून आवश्यकती मंडप उभारणी व इतर सोयीसुविधा पुरविण्याकरीता किमान पाच कोटी खर्च अपेक्षित धरून निविदा देखील काढल्या आहेत. तसेच कार्यक्रमाच्या नियोजनाकरीता मंत्रालयस्तरावर तसेच सिडको व जिल्हाधिकारी रायगड यांच्या स्तरावर विविध बैठका देखील घेण्यात आल्या.

अधिकाऱ्यांनी टाकला सुटकेचा निश्वास

परंतु, पंतप्रधानांचा ३० ऑक्टोबरचा संभाव्य दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे संदेश पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य शासनासह सर्व आयोजकांच्या मोबाईलवर धडकला. पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याने अधिकारी वर्गाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. कारण पंतप्रधानांच्या या संभाव्य दौऱ्यामुळे नवरात्री आणि विशेष करून दसरा सण कुटुंबासोबत साजरे करणे या अधिकाऱ्यांना शक्य झाले नसते. तसेच ३० ऑक्टोबरचा संभाव्य दौरा पुढे गेला असला, तरी ऐन दिवाळीत पंतप्रधानांनी नवी मुंबईचा दौरा आखू नये अशी मनोमन प्रार्थना या अधिकारी वर्गाकडून देवाकडे केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in