नवी मुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ; सात महिन्यांत १९५ मुली बेपत्ता, १७२ मुलींना शोधण्यात नवी मुंबई पोलिसांना यश

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून १४ ते १७ या वयोगटातील अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ; सात महिन्यांत १९५ मुली बेपत्ता, १७२ मुलींना शोधण्यात नवी मुंबई पोलिसांना यश
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून १४ ते १७ या वयोगटातील अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गत सात महिन्यांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून १९५ अल्पवयीन मुली अशा पद्धतीने बेपत्ता झाल्याचे उडकीस आले आहे. यातील १७२ मुलींना शोधण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी २०२३ पासून जुलै २०२३ या दीड वर्षाच्या कालावधीत सुमारे ६०० अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. यात अल्पवयीन मुलींची संख्या ४०० पेक्षा अधिक आहे. यातील सुमारे ५६० मुला-मुलींचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष तसेच स्थानिक पोलिसांना यश आले आहे. अपहरण झालेल्या मुलींपैकी बहुतेक मुली या १४ ते १७ या वयोगटातील असून बहुतांश मुलींना प्रेम प्रकरणातून तसेच लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेण्यात आल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. यातील अनेक अल्पवयीन मुलींनी प्रेमप्रकरणातून लग्न देखील केल्याचे आढळून आले आहे.

मुलींप्रमाणेच मुले बेपत्ता होण्याच्या घटना देखील वाढत असून गत साडे पाच वर्षांमध्ये सुमारे ५०० मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. यातील ४७० मुलांचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष तसेच स्थानिक पोलिसांनी शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात केले आहे. यातील बहुतांश मुले ही आई-वडील अभ्यासावरून रागावल्यामुळे, गेम खेळू न दिल्यामुळे, परीक्षेत नापास होण्याच्या भितीने, तर काही मुले इतर किरकोळ कारणांवरून रागाच्या भरात घर सोडून गेल्याचे, तर काही मुले ही मौजमस्ती म्हणून घर सोडून निघून गेल्याचे तपासातून समोर आले आहे.

१९ गुन्हे पोक्सोसाठी वर्ग

मागील पाच वर्षांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यांतील शंभरहून अधिक गुन्हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अल्पावधितच उघडकीस आणून अपहृत मुलांना शोधण्याचे काम केले आहे. जानेवारी २०२३ ते १२ ऑगस्ट २०२३ या साडेसात महिन्यांच्या कालावधीत दाखल झालेल्या एकूण २८२ अपहरणाच्या गुन्ह्यांपैकी २४८ गुन्हे उघडकीस आणून त्यातील १७२ मुली व ७६ मुलांना शोधून काढले आहे. तसेच त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. यातील १९ गुन्हे हे पोक्सोसाठी वर्ग करण्यात आले आहेत. या वर्षातील उर्वरित ३४ अपहरणांच्या गुन्ह्यांतील अपह्रत मुला-मुलींचा शोध घेण्याचे काम अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in