वाशी-नेरूळ रेल्वे स्थानकादरम्यान लुटारुंच्या संख्येत वाढ; तीन फरार चोरांचा शोध सुरू

वाशी रेल्वे पोलिसांनी या लुटांरुविरोधात जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
वाशी-नेरूळ रेल्वे स्थानकादरम्यान लुटारुंच्या संख्येत वाढ; तीन फरार चोरांचा शोध सुरू

नवी मुंबई : वाशी ते नेरूळ या हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या लुटारुंनी हैदोस घातला असून या लुटारुंनी गत गुरुवारी एका दिवसामध्ये सानपाडा ते नेरूळ या रेल्वे स्थानकामध्ये तीन प्रवाशांना लुटून त्यांचे महागडे मोबाईल फोन व इतर महत्वाची कागदपत्रे लुटल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेतील लुटारुंपैकी एका लुटारुला प्रवाशांनी पकडले असले तरी इतर तीन लुटारू पळून गेले आहेत. वाशी रेल्वे पोलिसांनी या लुटांरुविरोधात जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

फैसल मोहम्मद हारुन शेख (२५) हा तरुण सीवूड्स येथे राहण्यास असून तो गुरुवारी सीवूड्स येथे जाण्यासाठी नेरूळ रेल्वे स्थानकात आला असता फलाट क्रं.३ वर मोबाईल फोनवर बोलत असताना, करण विठ्ठल लष्करे (२०) या लुटारुने फैसलच्या हातातील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन खेचून पलायन केले. यावेळी त्याचे इतर दोघे साथीदार देखील पळून जात असताना, रेल्वे पोलिसांनी प्रवाशांच्या मदतीने करण लष्करे याला पकडले.

दरम्यान, याच त्रिकुटाने गुरुवारी सायंकाळी जुईनगर रेल्वे स्थानक आवारात राजू गायकवाड (४२) या व्यक्तीला लुटल्याचे उघडकीस आले आहे. या त्रिकुटाने त्यांना झुडपामध्ये नेऊन जबरदस्तीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल फोन व पाकिट काढून घेतल्यानंतर पलायन केले.

नेरूळ भागात राहणारा एरोन मस्कारेहस (१८) हा तरुण मुंबईतील बांद्रा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असून सानपाडा रेल्वे स्टेशन येथे एका लुटारुने एरोन याच्या हातातील ४५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन खेचून धावत्या लोकलमधून फलाटावर उडी टाकून पलायन केले. या प्रकरणात देखील वाशी पोलिसांनी अज्ञात लुटारूविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in