

मुंबई : पश्चिम आशियामध्ये इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतासाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १५,४०० टन ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस’ (एलपीजी) घेऊन येणारे ‘ग्रीन आशा’ हे भारतीय ध्वजवाहक जहाज गुरुवारी नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणात (जेएनपीए) यशस्वीरीत्या दाखल झाले. जगातील सर्वात संवेदनशील सागरी मार्ग मानली जाणारी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पार करून हे जहाज भारतात पोहोचले आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे या मार्गावरून होणारी इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असताना, या जहाजाचे आगमन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
‘जेएनपीए’ने निवेदनात म्हटले की, ‘ग्रीन आशा’ या भारतीय जहाजाचे गुरुवारी ‘जेएनपीए’त जोरदार स्वागत करण्यात आले. हे जहाज होर्मुझची सामुद्रधनी यशस्वीरित्या ओलांडून ‘जेएनपीए’च्या बीपीसीएल-आयओसीएल संचलित लिक्विड बर्थवर नांगरले गेले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून ‘जेएनपीए’त पोहोचणारे हे अशा प्रकारचे पहिलेच जहाज असून, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
क्रू मेंबर्स आणि माल सुरक्षित
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावरील १५,४०० टन एलपीजी साठा, जहाज आणि जहाजावरील सर्व कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. जटिल भू-राजकीय परिस्थितीमध्येही सागरी मोहिमा राबवण्याची क्षमता आणि देशाचा जीवनावश्यक एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्याची कटिबद्धता यातून दिसून येते.
ऊर्जा सुरक्षेसाठी ‘जेएनपीए’चे महत्त्व
न्हावा शेवा किंवा ‘जेएनपीटी’ म्हणून ओळखले जाणारे हे बंदर भारताच्या कंटेनर आणि द्रव माल वाहतुकीसाठीचे प्रमुख केंद्र आहे. देशाच्या ऊर्जा पुरवठा साखळीत या बंदराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात या जहाजाच्या आगमनामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट झाली आहे.