कुठे नेऊन ठेवला आहे माथेरान माझा!

कुठे नेऊन ठेवला आहे माथेरान माझा!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा लागलेल्या रायगड जिल्ह्यातील माथेरान या पर्यटनस्थळासाठी आजवरच्या कार्यकाळात करोडोंचा निधी उपलब्ध झाला होता.

माथेरान/ चंद्रकांत सुतार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा लागलेल्या रायगड जिल्ह्यातील माथेरान या पर्यटनस्थळासाठी आजवरच्या कार्यकाळात करोडोंचा निधी उपलब्ध झाला होता. याच निधीच्या माध्यमातून हे नयनरम्य पर्यटनस्थळ विकसनशील होणे अपेक्षित होते. परंतु आलेल्या निधीचा सदुपयोग न केल्यामुळेच आजही बहुतांश कामे अत्यंत निकृष्ट पद्धतीने झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खूपच कमी क्षेत्र असलेल्या या ठिकाणी नियोजन पद्धतीने जर का विकासकामे मार्गी लावली असती तर काहीअंशी का होईना, हे स्थळ अधिक बहारदार झाले असते.

एमएमआरडीएच्या माध्यमातून गावातील एकूण सात ठिकाणी वस्ती, स्वच्छतागृहे उभारण्यात आली होती. त्यामध्ये सुद्धा निविदेप्रमाणे कामे न केल्यामुळे या वास्तूचा लाभ घेताना नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असलेली अस्वच्छता स्थानिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.

पर्यटकांसाठी एक नाविन्यपूर्ण आकाशगंगा प्रकल्प उभयारण्यात आला होता. तो सुद्धा सुरुवातीला दिखावा म्हणून पर्यटकांना आकाशातील ग्रह, तारे दाखविण्यात आले त्याबाबत थोडीफार माहिती देखील देण्यात येत होती. त्यानंतर हा प्रकल्प मागील पाच ते सहा वर्षांपासून बंद आहे, त्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रे धूळखात पडून आहेत. एकंदरीत या वास्तूसाठी लाखो रुपयांचा चुराडा केल्याची ओरड स्थानिकांकडून होत आहे.

अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या नगरपरिषदेच्या दवाखान्यात दानशूर व्यक्तींनी दिलेले लाखो रुपये किमतीचे साहित्य धूळ खात पडून आहे. काही शासकीय इमारतीच्या नूतनीकरणासाठी निविदेत नमूद केल्याप्रमाणे सागवानी लाकूड वापरण्यात आलेले नसून त्याजागी बाभूळच्या लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे. मुख्य रस्त्यासाठी लागणारे क्ले पेव्हर ब्लॉक हे उत्तम दर्जाचे आहेत की नाही, याची शहानिशा न करता कामांचा सपाटा सुरू ठेवल्यामुळे काही ठिकाणी कच्च्या ब्लॉकमुळे रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे. यावरून रहदारी करताना येथील वाहतुकीच्या साधनांना तसेच पायी चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना खूपच जिकीरीचे बनले आहे. अशाप्रकारे अनेक ठिकाणी तकलादू कामे केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठीच आणि स्वतःच्या लाभासाठी पूर्ण केल्याची माहिती नागरिकांनी दिली. आत्ताच्या माथेरानबाबत जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केले असून निधीचा सदुपयोग झाला नसल्याची भावना व्यक्त करत कुठे नेऊन ठेवले आहे माथेरानला! अशी टीका केली जात आहे. यापुढे तरी शासनाच्या निधीचा सदुपयोग करून या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सुज्ञ लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे सूर ऐकावयास मिळत आहेत.

स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब

पावसाळ्यात महत्त्वाच्या भागात मातीची धूप होऊ नये, यासाठी धूपप्रतिबंधक जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. त्या जाळ्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे या हा निधी देखील गंगाजळीत मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन कामासाठी दरवर्षी कोटी रुपये खर्च केले जातात. परंतु स्वच्छतेच्या नावाने नेहमीच बोंबाबोंब असते. गावातील काही होतकरू युवक दरवेळेस स्वच्छता मोहीम हातात घेऊन महत्त्वाच्या ठिकाणी डोंग, दऱ्यात जाऊन सुका कचरा, प्लास्टिक बाटल्यांसह अन्य प्लास्टिक कचरा गोळा करत असतात. काही ठिकाणी मोबाईल टॉयलेट उभारली आहेत, ती नियमितपणे स्वच्छ ठेवली जात नसल्याने पर्यटकांना विशेषतः महिला पर्यटकांना खूपच त्रासदायक ठरत आहे.

बहुतांश कामे तकलादू

काही वर्षांपूर्वी जवळपास १२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यामध्ये नेरळ- माथेरान घाटरस्ता, माथेरानचा मुख्य रस्ता आणि महत्त्वाच्या पॉईंट्सच्या सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात आला होता. मुख्यत्वे जी काही लोकाभिमुख पर्यटकांना सेवासुविधा निर्माण करणारी कामे होती, त्याकडे नगरपरिषदेच्या माध्यमातून करडी नजर ठेवून सर्व कामे उत्तम दर्जाची करून घेणे अपेक्षित होते. परंतु संबंधित अधिकारी वर्गाने ठेकेदाराच्या आणि स्वतःच्या फायद्यासाठी दुर्लक्ष केल्यामुळे बहुतांश कामे तकलादू झालेली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in