नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकासमोरील इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब असल्याच्या ई-मेलने नवी मुंबईत एकच खळबळ उडवून दिली. सदर घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी संपूर्ण मॉल रिकामा करून बॉम्ब शोधण्यासाठी मॉलची कसून तपासणी केली. तपासणी दरम्यान कोणतीही बॉम्बसदृश वस्तू किंवा काही संशयास्पद वस्तू मिळून न आल्याने अखेरीस दुपारनंतर इनॉर्बिट मॉल पुन्हा सुरू करण्यात आला.
इनॉर्बिट मॉल सर्वत्र प्रसिद्ध असल्याने लोक मोठ्या प्रमाणात या मॉलमध्ये गर्दी करत असतात. शनिवारी इनॉर्बिट मॉल वाशीच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हॅलो देअर आय फ्लान्टेड बॉम्ब्स इन द बिल्डिंग एव्हरी पर्सन इनसाईड द बिल्डिंग वील बी किल अशा आशयाचा बॉम्ब असल्याबाबतचा निनावी ई-मेल पाठवण्यात आला होता. सदरची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नवी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच बॉम्ब शोधक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर इनॉर्बिट मॉल तत्काळ निर्मनुष्य करण्यात आला. संपूर्ण मॉलची तपासणी केल्यानंतर मॉलमध्ये कोणतीही बॉम्बसदृश वस्तू अथवा काही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे दुपारी तीन वाजता सदर मॉल चालू करण्याची परवानगी पोलिसांनी दिली.
दरम्यान, वाशीतील या इनॉर्बिट मॉलसह देशभरातील एकूण २६ मॉलची नावे या मेलमध्ये असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.