माजी सैनिकानेच केली माजी सैनिकांची फसवणूक

रिझर्व्ह बँकेत सिक्युरिटी गार्डची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका माजी सैनिकाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील...
माजी सैनिकानेच केली माजी सैनिकांची फसवणूक
Published on

नवी मुंबई : रिझर्व्ह बँकेत सिक्युरिटी गार्डची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका माजी सैनिकाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील २७ माजी सैनिकांना तब्बल सव्वादोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदानंद भोसले असे या माजी सैनिकाचे नाव आहे.

या प्रकरणातील आरोपी सदानंद भोसले हा माजी सैनिक असून, तो खारघर येथे राहण्यास होता. तसेच तो सीबीडी बेलापूर येथील रिझर्व्ह बँकेत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. २०२० मध्ये ऐरोली येथे राहणारा एक माजी सैनिक दोन हजार रुपयांच्या फाटक्या नोटा बदलण्यासाठी सीबीडी बेलापूर येथील आरबीआय बँकेत गेला असताना त्याची ओळख आरोपी सदानंद भोसले याच्यासोबत झाली होती. त्यावेळी या माजी सैनिकाने २०१८ मध्ये आरबीआय बँकेची सिक्युरिटी गार्डसाठी परीक्षा दिल्याचे सदानंद भोसले याला सांगितले असता, सदानंद भोसले याने, तो देखील माजी सैनिक असल्याचे व त्याने आर्मीमधून निवृत्त झालेल्या अनेक माजी सैनिकांना आरबीआय बँकेत नोकरी लावून दिल्याचे सांगितले होते. तसेच त्याला आरबीआयमध्ये नोकरीला लावण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी चार लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर सदानंद भोसले याने वेगवेगळी कारणे सांगून या माजी सैनिकांकडून ६ लाख रुपये उकळले; नोकरीला लावण्याच्या बहाण्याने सदानंद भोसले याने अनेक लोकांची फसवणूक केल्याचे त्याला तेथील सुरक्षारक्षकांकडून समजले.

आरबीआयमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष

त्यानंतर या माजी सैनिकाने सदानंद भोसले याची माहिती काढली असता, त्याने महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, नागपूर व इतर जिल्ह्यातील एकूण २७ माजी सैनिकांना अशाच पद्धतीने आरबीआयमध्ये सिक्युरिटी गार्ड पदाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तब्बल सव्वादोन कोटी रुपये उकळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या माजी सैनिकाने सदानंद भोसले याच्याकडे आपले पैसे मागण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने टाळाटाळ केली; मात्र नंतर सदानंद भोसले याने न वटणारा ६ लाख रुपयांचा चेक देऊन पलायन केले. अखरे या माजी सैनिकाने नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये धाव घेऊन सदानंद भोसले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in