उरणमधील परदेशी पक्ष्यांच्या अधिवासावर JNPA चा भराव; सुमारे २२ हेक्टर परिसरावर माती, १०८ प्रकारच्या ५ लाख पक्ष्यांचा वावर

जेएनपीए सेझसाठी बनविण्यात येत असलेल्या रस्त्यासाठी आणखी एका पाणथळीवर भराव टाकण्यात येत असून त्यामुळे येथील परदेशी पक्ष्यांचे आश्रयस्थान संपुष्टात येणार आहे.
उरणमधील परदेशी पक्ष्यांच्या अधिवासावर JNPA चा भराव; सुमारे २२ हेक्टर परिसरावर माती, १०८ प्रकारच्या ५ लाख पक्ष्यांचा वावर
Published on

राजकुमार भगत/उरण

जेएनपीए सेझसाठी बनविण्यात येत असलेल्या रस्त्यासाठी आणखी एका पाणथळीवर भराव टाकण्यात येत असून त्यामुळे येथील परदेशी पक्ष्यांचे आश्रयस्थान संपुष्टात येणार आहे. जेएनपीए एसईझेडसाठी हा रस्ता बनविण्यात येत असून उरण-दास्तान मार्गालगतच्या जेएनपी-एसईझेडच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर हा भराव करण्यात येत आहे. हा भराव करताना सदर रस्त्याचा ठेकेदार कोणत्याही प्रकारचे पर्यावरणाचे नियम न पाळता येथे असलेली खारफुटीच्या झाडांवर देखील भराव टाकून बुजवले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी सावरखार पाणथळ क्षेत्रात जेएनपीटी सेझकडून झालेल्या नियमभंगाबाबत हरितप्रेमी गटांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींची दखल घेत त्यात ‘सर्वोच्च प्राधान्याने’ लक्ष घालण्याचे निर्देश पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण केंद्रीय मंत्रालयाने महाराष्ट्र शासन आणि राज्य पाणथळ प्राधिकरणाला दिले होते. मात्र शासकीय वरदहस्ताने पुन्हा जोमाने येथे भरावाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सावरखार पाणथळीचा समावेश उरण तहसीलदारांनी स्वत: सूचीबद्ध केलेल्या १३ घटकांत आढळत असताना पाणथळ क्षेत्राचा सुमारे २२ हेक्टर परिसर बुजवण्यात आला. पाणथळ क्षेत्राचे संरक्षण करण्यात अधिकारी वर्ग अयशस्वी ठरला असल्याचे पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण केंद्रीय मंत्रालयाने यापूर्वी ताशेरे ओढले होते.

उरण तालुका हा निसर्गाने नटलेला व सर्वसंपन्न तालुका होता. येथील पाणथळींवर विविध प्रकारचे १०८ प्रकारचे सुमारे ५ लाख पक्षी या भागात दरवर्षी येत असत. मात्र विकासाच्या नावाखाली हाच तालुका आता भकास होऊ लागला आहे. खाडीकिनाऱ्यावर मोठमोठे भराव टाकले जात आहेत. यामुळे येथील डोंगर नष्ट होऊन येथील वनराईही नष्ट झाली आहे. प्रचंड प्रमाणात होणारी झाडांची कत्तल, पाणथळीवर होणारे भराव, खारफुटीची होणारी बेसुमार कत्तल यामुळे येथील वन्यजीवांचे नैसर्गिक आश्रयस्थळे नष्ट झाली आहेत. याचा परिणाम येथील वन्य जीवनावर होऊन येथील वन्य जीवन विस्कळीत झाले आहे.

पक्षीप्रेमींमध्ये नाराजी

उरण तालुका हा येथे येणाऱ्या फ्लेमिंगो, पेंटेड स्टोर्क, ईबीस, स्पुनबिल, ओपन हेडबिल यासारख्या पक्ष्यांमुळे वन्यजीव प्रेमी, पक्षीप्रेमी व पक्षी निरीक्षकांमध्ये प्रसिद्ध होते. येथील येणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण, अभ्यास व छायाचित्र काढणाऱ्यांची येथील किनाऱ्यावर गर्दी होत असे. आता मात्र येथील पाणवठ्याचे भाग नष्ट होऊ लागले आहेत. तालुक्यातील भेंडखळ पाणथळी, सावरखार पाणथळी, पागोटे पाणथळी, बेलपाडा पाणथळी, दास्तान फाटा येथे भराव झाल्यामुळे अगोदरच येथील पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. त्यातच आत्ता पाणजे पाणथळ सुकविल्याने पक्षीप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

उरण तालुक्यातील पक्ष्यांची अनेक आश्रयस्थाने ही नष्ट करण्यात आली आहेत. जेएनपीए सेझ प्रवेश द्वाराजवळचे हे पाणथळ क्षेत्र पक्षीप्रेमीसांठी पर्वणी होते. येथे अनेक दुर्मिळ पक्षी येत असतात. रस्त्यालगत हे पाणथळ असल्याने पक्षी निरिक्षण करण्यास अतीशय योग्य ठिकाण होते मात्र आत्ता तेही नष्ट होणार असल्याने पक्षी प्रेमी आणि निसर्गाचे मोठे नुकसान होणार आहे.

- विवेक केणी, (अध्यक्ष वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था)

logo
marathi.freepressjournal.in