कामोठेत स्कूल व्हॅनच्या धडकेत ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

इको स्कूल व्हॅनने रस्त्यालगत उभ्या असलेल्या तिघांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ९ वर्षीय बालकाचा मृत्यू, तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना कामोठे येथील जुई गावात रविवारी मध्यरात्री घडली.
कामोठेत स्कूल व्हॅनच्या धडकेत ९ वर्षीय बालकाचा मृत्यू

नवी मुंबई : इको स्कूल व्हॅनने रस्त्यालगत उभ्या असलेल्या तिघांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ९ वर्षीय बालकाचा मृत्यू, तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना कामोठे येथील जुई गावात रविवारी मध्यरात्री घडली. कामोठे पोलिसांनी या अपघातानंतर पळून गेलेल्या इको स्कूल व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या अपघातातील मृत बालकाचे नाव आर्यन (९ वर्षे) असे असून, जखमी झालेंची नावे मंगल बाळु रोकडे (५०) व नधिया प्रदिप साळवे (२०) अशी आहेत. हे तिघेही कामोठे भागात राहण्यास असून, ते कचरा वेचण्याचे काम करतात. आर्यनची आई अंजली साळवे ही रविवारी दिवसभर आपल्या मुलांसह कामोठे परिसरात कचरा वेचण्याचे काम केले होते. त्यांनतर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास अंजली, तिचा ९ वर्षांचा मुलगा आर्यन, मंगल रोकडे व निधिया साळवे यांच्यासोबत घरी जाण्यासाठी जुई गावच्या गेटजवळ उभे होते.

याचवेळी जुईगाव गेटकडुन जुईगावाकडे जाणाऱ्या भरधाव इको स्कूल व्हॅनने या तिघांना पाठीमागून जोरात धडक दिली. त्यानंतर सदर इको स्कूल व्हॅन लाईटच्या खांबाला धडकल्यानंतर चालकाने त्याठिकाणावरुन पलायन केले. या अपघातात जखमी झालेल्या तिघांना ग्रामस्थांनी कामोठे येथील एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी ९ वर्षीय आर्यनला मृत घोषीत केले. या अपघातातील जखमी मंगल रोकडे व नधिया साळवे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in