Navi Mumbai : करंजा बंदरात साठला मोठ्या प्रमाणात गाळ; ३०० मासेमारी बोटी अडकल्या, मच्छिमारांच्या उपजीविकेवर संकट

उरण तालुक्यातील करंजा बंदरावर सध्या मोठ्या प्रमाणावर गाळाचे संकट आले असून, यामुळे सुमारे ३०० मासेमारी बोटी बंदरातच अडकून पडल्या आहेत. गाळामुळे बोटी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकत नसल्याने हजारो मासेमारांच्या उपजीविकेवर थेट परिणाम झाला आहे.
उरण: करंजा बंदरात साठला मोठ्या प्रमाणात गाळ; ३०० मासेमारी बोटी अडकल्या, मच्छिमारांच्या उपजीविकेवर संकट
उरण: करंजा बंदरात साठला मोठ्या प्रमाणात गाळ; ३०० मासेमारी बोटी अडकल्या, मच्छिमारांच्या उपजीविकेवर संकट
Published on

उरण : तालुक्यातील करंजा बंदरावर सध्या मोठ्या प्रमाणावर गाळाचे संकट आले असून, यामुळे सुमारे ३०० मासेमारी बोटी बंदरातच अडकून पडल्या आहेत. गाळामुळे बोटी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकत नसल्याने हजारो मासेमारांच्या उपजीविकेवर थेट परिणाम झाला आहे. समुद्राला जास्त निखार असल्यावर अशा प्रकारचे संकट ओढवते. त्यामुळे या गंभीर समस्येवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी मासेमार संघटनांनी शासनाकडे १०० कोटी रुपयांच्या तातडीच्या निधीची मागणी केली आहे.

बंदराच्या विकासासाठी आणि गाळ काढण्यासाठी गेल्या ७ वर्षांपासून राज्य सरकारकडे १८३ कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मात्र, त्याला अद्यापपर्यंत प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. गाळामुळे बोटींना किनाऱ्याजवळ आणणे तसेच समुद्रात घेऊन जाणे अत्यंत कठीण झाले आहे. मासेमार बांधवांना बोटी काढण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करावी लागत आहे. मुंबई बंदर विभागाने करंजा बंदर धक्क्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान, साचलेल्या गाळाची खोली आणि त्याचे प्रमाण तपासण्यात आले. बंदर विभागाने तत्काळ गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती गोळा केली असून, याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. या संकटावर तातडीने तोडगा काढण्यासाठी करंजा मच्छिमार सहकारी संस्थेने शासनाकडे विशेष मागणी केली आहे. “बोटी व्यवस्थित कार्यान्वित होण्यासाठी, किमान १०० कोटी रुपयांचा तातडीचा निधी मंजूर करण्यात यावा,” अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यामुळे जवळपास २५ हजार मासेमार कुटुंबांचे उपजीविकेचे चक्र पूर्णपणे थांबले आहे. मासेमारी बंद असल्यामुळे मासेमार व त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मासेमारी बोटी अडकल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आणखी १०० बोटींची सोय होईल

वेस्ट पर्ससीन नेट फिशरमन वेल्फेअर असो.चे संचालक रमेश नाखवा म्हणाले की, बंदर विभागाचे अधिकारी राजेश अग्रवाल यांनी पहाणी केली. तरीही कोणतीही उपाययोजना केली नाही. या करंजा बंदरातील गाळ काढून चॅनलची खोली वाढवण्यात यावी तसेच बंदराच्या बाहेरील धक्क्याच्या लगत जो ब्रेक वॉटर दगडी बंधारा बांधला आहे. तेथील दगड काढून त्या ठिकाणी बोटींसाठी धक्का बनवावा. त्यामुळे येथे आणखी १०० हून अधिक बोटी लागू शकतील, अशी मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in