

नवी मुंबई : खारघर टेकडीवरील चाफेवाडी पाडा परिसरात बिबट्या दिसल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने गस्त वाढवून बिबट्याला बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
खारघर डोंगरावर मागील काही वर्षांत वनविभागाकडून मोठ्या प्रमाणात रोपलागवड करण्यात आली आहे. बांधकामाचा आवाज, नैसर्गिक अधिवास घटल्याने बिबट्या, कोल्हा यांसारखे वन्यजीव टेकडीच्या जंगलात आश्रय घेत असल्याची चर्चा परिसरात आहे.
सुमारे चार महिन्यांपूर्वी चाफेवाडीकडून फणसवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडताना बिबट्या दिसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. यानंतर पाणथळ जागी सीसीटीव्ही बसवणे व पावलांचे ठसे शोधण्याची मोहीम राबविण्यात आली; मात्र काहीही हाती लागले नव्हते. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता चाफेवाडी पाडा लगत पुन्हा बिबट्या दिसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यामुळे चाफेवाडी व फणसवाडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खारघर डोंगरावर बिबट्या असल्याच्या तक्रारींनंतर चार महिन्यांपूर्वी गस्त घालण्यात आली होती, परंतु कोणतेही ठसे मिळाले नव्हते. आता पुन्हा तक्रारी येत असल्याने पाड्यात पाहणी करून योग्य ती उपाययोजना करण्यात येईल. - गजानन पांनपट्टे, वन परिक्षेत्र अधिकारी, पनवेल वन विभाग