

धैर्य गजरा/मुंबई
नवी मुंबई विमानतळावरून प्रवासी वाहतुकीपाठोपाठ माल वाहतुकीस प्रारंभ झाला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचे ‘आयएक्स-२०७’ हे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबूधाबीसाठी रवाना झाले. या विमानातून कोकणातील ताजे पेरू आणि शेवग्याच्या शेंगांचे (मोरिंगा) बॉक्स संयुक्त अरब अमिरातीला पाठवण्यात आले.
या १.७९ टन माल वाहतुकीमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय मालवाहू (कार्गो) वाहतुकीची नोंद झाली असून, यामुळे पश्चिम भारतातील निर्यातदारांसाठी एक नवीन मार्ग खुला झाला आहे.
नवी मुंबई-अबूधाबी मार्गावर चालणाऱ्या ‘बोईंग ७३७-८’ या विमानामध्ये साधारण २.५ टन माल वाहून नेण्याची क्षमता आहे. यामुळे पश्चिम भारतातील नाशवंत आणि वेळेचे बंधन असलेल्या मालाच्या वाहतुकीसाठी एक महत्त्वपूर्ण मार्ग तयार झाला आहे. एअर इंडियाला अपेक्षा आहे की, या सेवेद्वारे दरमहा सुमारे २५ टन मालाची वाहतूक होईल, ज्यामुळे यूएई आणि संपूर्ण आखाती देशांमध्ये भारतीय ताज्या उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होईल.
या उद्घाटनाच्या पहिल्याच खेपेत कोकणातील पेरूंचा वाटा सर्वात जास्त होता. हा प्रदेश आपल्या सुपीक जमिनीसाठी आणि फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. यासोबतच विमानात शेवग्याच्या शेंगाही होत्या, ज्यांच्या पौष्टिक मूल्यामुळे आणि आरोग्य जागरूक ग्राहकांमधील वाढत्या लोकप्रियतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांना मोठी मागणी आहे.
नव्याने सुरू झालेल्या आठवड्यातून दोन विमानांच्या सेवेमुळे, जी पुढे जाऊन आठवड्यातून तीन केली जाणार आहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्रातील निर्यातदारांसाठी एक नवीन प्रवेशद्वार बनण्याची अपेक्षा आहे. आखाती देशांमधील ग्राहकांना पश्चिम भारतात अवघ्या काही तासांपूर्वीच काढलेली ताजी उत्पादने मिळतील, तर परदेशातील खरेदीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हा विमानतळ एक जलद मार्ग ठरेल असेही म्हटले जात आहे.
एअर इंडियाचे कार्गो प्रमुख रमेश ममिडाला म्हणाले, ‘नवी मुंबईतील या पहिल्या निर्यात शिपमेंटमुळे पश्चिम भारतातील उत्पादक, व्यापारी आणि व्यावसायिक थेट या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपैकी एका बाजारपेठेशी जोडले गेले आहेत.
निर्यातदारांसाठी जलद मार्गाची निर्मिती
आखाती देश ही भारतीय उत्पादनांसाठी दीर्घकाळापासून एक मजबूत बाजारपेठ राहिली आहे. नवी मुंबईतून अतिरिक्त क्षमता उपलब्ध करून देऊन, आम्ही निर्यातदारांसाठी अधिक जलद आणि कार्यक्षम मार्ग तयार करत आहोत आणि भारताच्या कृषी निर्यात व्यवस्थेला बळकट करत आहोत, असे ममिडाला यांनी पुढे सांगितले.