

नवी मुंबई : सेवेची आणि प्रगतीची यशस्वी ३७ वर्षे पूर्ण केल्याबद्दल कोकण रेल्वेचा ३७ वा स्थापना दिन १५ ऑक्टोबर रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, संचालक (संचालन) सुनील गुप्ता, संचालक (मार्ग व बांधकाम) राजीव कुमार मिश्रा, मुख्य दक्षता अधिकारी अविनाश तारवाडकर आणि केआरडब्ल्यूसीच्या अध्यक्ष मनीषा झा उपस्थित होत्या.
कोकण रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १९९.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या अडीच वर्षांत २० हजार ५९ कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प मिळाले असून, २३ हजार ५५२ कोटी रुपयांच्या प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) लवकरच काँगोमध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करणार असून, श्रीलंकेतील पुलांच्या पुनर्वसनासाठीही निविदा प्रक्रियेत सहभागी झाली आहे, अशी माहिती संतोष कुमार झा यांनी दिली.
भविष्यातही देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात कोकण रेल्वेचे योगदान मोलाचे राहील, असा विश्वास अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी व्यक्त केला.
भरती प्रक्रिया आणि कर्मचारी कल्याणावर भर
रेल्वे बोर्डाने मंजूर केलेल्या १९० पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून, २०१ सुरक्षा पदांसाठी भरती सुरू आहे. चालू वर्षात सुमारे ४०० नवीन रिक्त पदे भरण्याचे नियोजन आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘सीधी बात’ या उपक्रमांतर्गत आयोजित सहा सत्रांमध्ये २९ समस्यांचा तातडीने निपटारा करण्यात आला. पुढील पाच वर्षांत प्रवासी सुविधांसाठी १०५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
सामाजिक उपक्रमांतही योगदान
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत २४५ उन्हाळी विशेष, ३७९ गणपती विशेष आणि पाच सण विशेष गाड्या चालवण्यात आल्या. कोकण रेल्वेला चालू वर्षात स्कोच पुरस्कार, महात्मा पुरस्कार, गव्हर्नन्स नाऊ पुरस्कार आणि सर्वश्रेष्ठ नराकास सन्मान असे चार प्रमुख पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या अडीच वर्षांत कंपनीला एकूण १३ राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची वार्षिक आर्थिक मदत देण्यात आली आहे.