कोपरखैरणेतील अंतर्गत रस्ते अद्यापही खड्डेमय; अपूर्ण डागडुजीमुळे नागरिक त्रस्त

कोपरखैरणे परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था जुलै महिन्यातही सुधारलेली नाही. जागोजागी खड्डे, राडारोड्याचे ढिगारे, उघड्या भूमिगत केबल्स आणि अपूर्ण डागडुजीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाने जोर धरल्याने हे रस्ते प्रवासासाठी अधिकच धोकादायक ठरत असून, यंदाही खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होणार, अशी भीती व्यक्त होत आहे.
प्रातिधिक छायाचित्र
प्रातिधिक छायाचित्र
Published on

नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था जुलै महिन्यातही सुधारलेली नाही. जागोजागी खड्डे, राडारोड्याचे ढिगारे, उघड्या भूमिगत केबल्स आणि अपूर्ण डागडुजीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाने जोर धरल्याने हे रस्ते प्रवासासाठी अधिकच धोकादायक ठरत असून, यंदाही खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होणार, अशी भीती व्यक्त होत आहे.

कोपरखैरणे नोडमधील वाशी-कोपरखैरणे मुख्य रस्ता वगळता बहुतेक सर्व अंतर्गत रस्ते डांबरी आहेत. सध्या मुख्य मार्गावर कामे वेगात सुरू असली तरी अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. सेक्टर १९ A, B, C तसेच सेक्टर ६, ७, ८ या भागांत तात्पुरत्या स्वरूपात मिक्श्चर टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, स्वच्छता न ठेवता मातीवरच मिश्रण टाकण्यात आल्याने ते पुन्हा उखडले आहे, असा आरोप रहिवासी संग्राम कामत यांनी केला.

अनेक ठिकाणी भूमिगत केबल टाकताना पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने त्या उघड्या अवस्थेत आल्या आहेत. त्याचप्रमाणे, बांधकाम स्थळांवरील राडारोडा थेट रस्त्याच्या कडेला टाकल्याने रस्त्यांवर अडथळे निर्माण होत आहेत. हे सर्व प्रकार नागरी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर ठरत आहेत.

खड्ड्यांचे पॅचिंग की अपघाताचे आमंत्रण?

सेक्टर १ ते ४, १५ ते १८ आणि बोनकोडे गावठाण या भागांतील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या वाढत आहे. राडारोड्यावर मिक्श्चर टाकल्यामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध उंच भाग निर्माण झाला असून, तो गतिरोधकासारखा ठरत आहे. अशा ठिकाणी वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

पालिकेचे स्पष्टीकरण

कोपरखैरणे विभागाचे अभियंता संतोष शिकतोडे यांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्वीची जवळपास ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे काही दिवस काम मंदावले होते. मात्र, आता उघडीप मिळाल्याने अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आणि डांबरीकरणाचे काम वेगात सुरू असून लवकरच ही कामे पूर्ण होतील.

logo
marathi.freepressjournal.in