मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनचालकांसोबत लूटमार; पाच जणांची टोळी अटकेत

एक्स्प्रेस महामार्गावर वाहनचालकांना लुटणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी मुंबई : एक्स्प्रेस महामार्गावर वाहनचालकांना लुटणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. विशाल जाधव (२७), स्वप्नील वाघमारे (२०), सौरभ वाघमारे (२५), रितेश पवार (२१), अमित वाघमारे (२०) अशी या आरोपींची नावे असून या टोळीने पनवेल तालुक्यासह रसायनी, खालापूर, चौक, कर्जत व नेरूळ या भागात केलेले लुटमारीचे ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी या टोळीकडून २१ मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन पल्सर मोटारसायकल असा सुमारे ६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या टोळीने गत आठवड्यामध्ये पनवेल तालुक्यातील मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील पळस्पे हायवे येथील वाहतूक चौकीजवळ ट्रकच्या टायरमधील हवा चेक करण्यासाठी थांबलेल्या ट्रकचालक व क्लिनरला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्यांच्याजवळ असलेला मोबाईल फोन व रोख रक्कम लुटून पलायन केले होते. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या टोळीचा माग काढण्यास सुरुवात केली होती.

या दरम्यान, पोलिसांनी बातमीदाराकडून या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळवून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता सदर टोळीने रसायनी, खालापूर, चौक, कर्जत व नेरूळ या भागात सुद्धा अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या टोळीला अटक करून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचे २१ मोबाईल फोन तसेच या टोळीने गुन्हे करण्यासाठी वापरलेल्या दोन पल्सर मोटारसायकल असा सुमारे ६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in