अनेक लढ्यांचा साक्षी असलेला चिरनेरचा गणपती, माघी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात

माघी गणेशोत्सव हा सण म्हणजे चिरनेर गावासाठी आणि चिरनेर परिसरासाठी एक विशेष पर्वणीच असते.
अनेक लढ्यांचा साक्षी असलेला चिरनेरचा गणपती, माघी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात

राजकुमार भगत/उरण

माघी गणेशोत्सव हा सण म्हणजे चिरनेर गावासाठी आणि चिरनेर परिसरासाठी एक विशेष पर्वणीच असते. चिरनेरचा हा माघी गणेशोत्सव नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात प्रसिद्ध असून या उत्सवानिमित्त हजारो गणेशभक्त चिरनेर या ऐतिहासिक गावात चिरनेर महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. यावर्षी गणेशोत्सव मंगळवार ता. १३ रोजी अंगारकी योग असल्याने या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. माघी गणेशोत्सवासाठी चिरनेर गाव सज्ज झाले असून गावातील प्रत्येक गल्ली आणि रस्ते शेणाने सारवून त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून गाव सजविण्यात आले आहे.

दोन दिवस सुरू असलेल्या या उत्सवात भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी सोहळा यांची प्रचंड रेलचेल असते. ऐतिहासिक चिरनेर गावात सुंदर आणि स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे. पेशव्यांचे सुभेदार रामजी फडके यानी हे मंदिर बांधले असून पेशवे कालात बांधलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्याचा भाग पूर्वीप्रमाणेच असून सभा मंडपाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. हा गणपती नवसाला पावणारा असल्याने दर मंगळवारी, संकष्टी चतुर्थीला येथे दूरदूरवरून मोठ्या प्रमाणात भाविक या महागणपतीच्या दर्शनासाठी येतात.

चिरनेर महागणपतीला ऐतिहासिक आणि पौराणीक महात्म्य आहे. पेशवे कालीन राजवटीत या मंदिराची निर्मिती झाली. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे कर्नाळा प्रांताचे सुभेदार रामजी फडके यांनी या मंदिराची निर्मिती केली. रामजी फडके यांच्या स्वप्नात दृष्टांत देऊन मी तळ्यात पडलेला असून माझी प्रतिष्ठापना करावी असे सांगितले. त्यानंतर तळ्यातून ही मूर्ती काढण्यात आली अशी अख्यायिका आहे. अखंड पाषाणातील या मूर्तीची उंची ७ फूट आणि रूंदी साडेतीन फूट आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून गणपतीच्या उजवीकडील हातात परशू आहे. तर दुसरा हाताने आशीर्वाद देत आहेत. डाव्याबाजूच्या वरच्या हातात पाश आहेत तर दुसऱ्या हातात मोदक आहे.

डोक्यावर मुकुट असून या गणेशाची सोंड डावीकडे आहे म्हणजे सिद्धीविनायक आहे. ही मूर्ती तिळातिळाने वाढते अशी अख्यायिका आहे. पूर्वी माघी गणेशोत्सवाला चिरनेर गावात मोठ्या प्रमाणात गणेशभक्त गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येत असत, मात्र गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांची उदासिनता, शासनाने हे गाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात चालविलेला चालढकलपणा आणि त्यामुळे येथे सुविधांची वानवा आहे. तरी चिरनेरच्या महागणपतीचे महात्म्य मात्र तीळमात्र देखील कमी झालेले नाही.

गणपतीच्या दर्शनासाठी लोकांची अफाट गर्दी

या मंदिराच्या साक्षीने अनेक लढे आणि चळवळी उभ्या राहिल्या असून १९३० चा जंगल सत्याग्रह देखील या मंदिराच्या परिसरात झाला. त्याच्या खुणा चिरनेरच्या मंदिरामध्ये दिसून येत आहेत. चिरनेर जंगल सत्याग्रहावेळी गोळी लागलेला एक गज अजूनही या मंदिरात जतन करून ठेवलेला आहे. चिरनेर जंगल सत्याग्रहातील सत्याग्रहींना याच मंदिरात अटक करून ठेवण्यात आले होते. या मंदिराच्या साक्षीने सुरू केलेला महामुंबई सेझचा लढा देखील यशस्वी झाला आहे. अनेक मंत्री, मुख्यमंत्री, साहित्यिक, नेतेमंडळी यांनी या गणेशाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतलेले आहेत. अशा या चिरनेरच्या महागणपतीची महती असून दिवसेंदिवस या गणपतीच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी वाढत आहे.

logo
marathi.freepressjournal.in