चिरनेरचा शंभू महादेव अजूनही अपरिचित!

पूर्वाश्रमीच्या अपरांत म्हणजेच सध्याच्या कोकण प्रांतातील चिरनेर हे पुरातन इतिहासाचा वारसा सांगणारे सुंदर गाव!
चिरनेरचा शंभू महादेव अजूनही अपरिचित!

उरण : पूर्वाश्रमीच्या अपरांत म्हणजेच सध्याच्या कोकण प्रांतातील चिरनेर हे पुरातन इतिहासाचा वारसा सांगणारे सुंदर गाव! रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात हे ऐतिहासिक गाव निसर्गसंपन्न डोंगरकुशीत वसले आहे. गावात अठरापगड जातींची वस्ती आणि त्याअनुसरून गावात पुरातन मंदिरांची संख्याही लक्षणीय!! चिरनेरचे महागणपती देवस्थान तर सुपरिचित आहेच पण शिलाहार राजवटीचा इतिहास सांगणारे शंभू महादेवाचेही प्राचीन स्वयंभू देवस्थान चिरनेर गावात आहे. मात्र प्रसिद्धीपासून दूर राहिल्याने हे देवस्थान अनेकांना परिचित नाही.

चिरनेरच्या प्राचिनतेचा इतिहास सुमारे १२०० वर्षांपूर्वीच्या शिलाहार राजवटीशी जोडला गेला आहे. बिंब राजाची अपरांत प्रांतावर अधिसत्ता होती. माहीम ते मालवणपर्यंत त्याचे साम्राज्य पसरले होते. या राजवटीत त्याने अनेक बंदरे विकसित केली. त्यात चिरनेर या बंदराचाही समावेश होतो.

या बंदरातून पूर्वी मोठ्या प्रमाणात मुंबई प्रांताशी व्यापार चालायचा त्यामुळे व्यापाराच्या उद्देशाने या गावात अठरापगड जातीच्या लोकांची वस्ती झाली. गावाच्या निसर्गसौंदर्यामुळे शिलाहार राजवटीत या गावात अनेक लहानमोठी मंदिरे उभारली गेली. त्यामध्ये शंभू महादेवाचे मंदिरही उभारले गेले.

logo
marathi.freepressjournal.in