महापे-शीळ फाटा मार्ग बनतोय मृत्यूचा सापळा; २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीतील महापे-शीळ फाटा मार्ग आता अपघातप्रवण ठरत आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्यावर वेगावर नियंत्रण नसल्याने दररोज अपघात होत असून, काही आठवड्यांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याचा आणि गुरुवारी पुन्हा एका तरुणाचा मृत्यू झाला.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी मुंबई : महापे-शीळ फाटा हा ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीतून जाणारा महत्त्वाचा मार्ग आता मृत्यूचा सापळा ठरत आहे. विस्तीर्ण व सिमेंट काँक्रीटीकरण केलेला रस्ता असल्याने वाहनचालक वेगावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. चालकांच्या बेपर्वाईमुळे रोज छोटे–मोठे अपघात घडत असून, गेल्या काही आठवड्यांपूर्वी वाहतूक नियंत्रित करताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. तर गुरुवारी पुन्हा अशाच एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.

गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एल अँड टी कंपनीसमोर ही घटना घडली. गौरव येडगे (२९) हा स्कुटीवरून महापेच्या दिशेने जात असताना, कंटेनर (क्र. एमएच ०४ जेके ३६४२) चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे गाडी चालवली. स्कुटीला मागून जोरदार धडक दिल्यानंतर गौरव रस्त्यावर पडला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता त्याच्यावरून कंटेनर पुढे नेला. यात त्याच्या पोटावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे बेलापूर, शीव-पनवेल, उरण फाटा आणि जेएनपीटीप्रमाणेच शीळ फाटा-महापे हा मार्ग महत्त्वाचा असून, तो बदलापूर, कल्याण, डोंबिवली एमआयडीसी व मुंबई अंधेरी एमआयडीसीला जोडतो. तसेच नाशिक-गुजरातदरम्यानची जड वाहनांची वाहतूक याच मार्गावरून होते. जेएनपीटीनंतरचा हा सर्वाधिक व्यस्त मार्ग मानला जातो. एमआयडीसीतील बहुतांश अंतर्गत रस्ते खराब झाल्याने वाहनचालक या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर आल्यानंतर सुसाट वेगाने जातात.

परिणामी रोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. वाहतुकीच्या वाढत्या ताणामुळे वाहतूक पोलिसांनी येथे महापे बिट चौकी स्थापन केली असली, तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे.

याआधीही पोलिसाचा मृत्यू

२४ जुलै रोजी वाहतूक नियंत्रित करत असताना हायड्राची गाडी अनियंत्रित होऊन गणेश पाटील या वाहतूक हवालदाराला धडकली होती. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. अवघ्या दोन महिन्यांत आणखी एका तरुणाचा जीव जाण्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

logo
marathi.freepressjournal.in