महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये १२ जणांचा मृत्यू; उद्धव ठाकरे म्हणाले, "आता कोण कोणावर कारवाई करणार?"

नागपूरमधील महाविकास आघाडीचा कार्यक्रम आटपून उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी घेतली नवी मुंबईतील रुग्णालयातील रुग्णांची भेट
महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये १२ जणांचा मृत्यू; उद्धव ठाकरे म्हणाले, "आता कोण कोणावर कारवाई करणार?"

ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई येथील खारघरमधील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर भरदुपारी रंगलेल्या या सोहळ्यानंतर उष्माघातामुळे ११ श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता. तर सोमवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. रविवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा कार्यक्रम आटपल्यानंतर नवी मुंबईमध्ये जाऊन रुग्णालयात दाखल रुग्णाची भेट घेतली. तसेच, त्या दोघांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "कार्यक्रमाची चुकीची वेळ कोणी आणि कशी दिली? ढिसाळ नियोजनामुळे चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागले असून ही घटना दुर्देवी आहे." असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा गोव्याला जाणार होते, म्हणून कार्यक्रमाची वेळ ही सकाळची घेण्यात आल्याची चर्चा आहे. यावर त्यांना विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, "या घटनेची चौकशी करतील की नाही माहीत नाही. अमित शहांना जर जायचे होते म्हणून कार्यक्रम भर दुपारी घेतला गेला असेल तर चौकशी कोण कोणाची करणार?" असा सवाल त्यांनी केला. तसेच ते म्हणले की, "निरपराध जीव गेले असून एका चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. आम्हाला धर्माधिकारी कुटुंबाचा अभिमान असून अनेक पिढ्यांपासून हे कुटुंब काम करत आहे. त्या कार्यक्रमाला फक्त अमित शहांना वेळ नव्हती, म्हणून दुपारची वेळ घेतली असेल तर हे बरोबर नाही." अशी टीका त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in