महाराष्ट्रातील सर्वात मोठे डायलिसीस सेंटर नवी मुंबईत; आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी

मूत्रपिंडांची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर रुग्णांना नियमित डायलिसीसची गरज भासते. सर्वसाधारणपणे एका डायलिसीससाठी ३,००० ते ३,५०० रुपये खर्च येत असल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसीस करणे अनेक रुग्णांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण ठरते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे डायलिसीस सेंटर नवी मुंबईत; आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी
महाराष्ट्रातील सर्वात मोठे डायलिसीस सेंटर नवी मुंबईत; आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी(Photo-X/@NMMConline)
Published on

नवी मुंबई : मूत्रपिंडांची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर रुग्णांना नियमित डायलिसीसची गरज भासते. सर्वसाधारणपणे एका डायलिसीससाठी ३,००० ते ३,५०० रुपये खर्च येत असल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसीस करणे अनेक रुग्णांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण ठरते. ही बाब लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका (नमुमंपा) ने वाशी, सेक्टर-१४ येथील विवेकानंद सांस्कृतिक केंद्र इमारतीत ५० बेड्स क्षमतेचे विशेष डायलिसीस सेंटर सुरू केले आहे. एकाच छताखाली इतक्या मोठ्या संख्येने डायलिसीस बेड्स उपलब्ध असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे डायलिसीस सेंटर असल्याचे सांगितले जात आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या डायलिसीस सेंटरची पाहणी करून उपलब्ध सुविधेचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांना लाभ मिळावा यासाठी या केंद्राची माहिती व्यापक स्तरावर प्रसारित करण्याचे निर्देश दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, उद्यान विभागाच्या उपायुक्त स्मिता काळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. जानेवारीपासून सुरू झालेल्या या विशेष केंद्राचा लाभ आतापर्यंत १ हजारांहून अधिक रुग्णांनी घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

एनसीडी अभियानांतर्गत आरोग्य तपासणी

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अंतर्गत एनसीडी (Non-Communicable Diseases) अभियानाद्वारे ३० वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या आजारांचे लवकर निदान व उपचार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.

नमुंमपाकडे एकूण ८५ डायलिसीस बेड्स

  • सध्या वाढत्या मधुमेहाच्या पार्श्वभूमीवर डायलिसीसची गरज वाढत असल्याचे लक्षात घेऊन नमुंमपाने विविध रुग्णालयांमध्ये एकूण ८५ डायलिसीस बेड्स उपलब्ध करून दिले आहेत.

  • विशेष डायलिसीस सेंटर, वाशी - ५० बेड्स

  • वाशी सार्वजनिक रुग्णालय - १० बेड्स

  • नेरूळ रुग्णालय - ११ बेड्स

  • ऐरोली रुग्णालय - ११ बेड्स

  • सीबीडी बेलापूर, सेक्टर ८ सेंटर - ३ बेड्स

वाशी सार्वजनिक रुग्णालय येथे एमआरआय, कॅथलॅब, सीएसएसडी, मॉड्युलर मॉर्च्युरी आणि मिल्क बँक यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा लवकरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महानगरपालिका आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि क्षमता वाढविण्यासाठी तसेच प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलली जात आहेत.

डॉ. कैलास शिंदे , आयुक्त

logo
marathi.freepressjournal.in