
नवी मुंबई : शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण असल्याची खुली चर्चा सुरू असताना आता किमान दहा ते बारा माजी नगरसेवक तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील एकूण १३ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्ष प्रवेश होणार आहे. आपापल्या प्रभागात वजनदार म्हणून हे माजी नगरसेवक ओळखले जात असून अनेकांनी अनेक टर्म नगरसेवक पद भोगले आहे. रविवारपासून पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व नगरसेवकांचे मोठमोठे पोस्टर शहरभर झळकत आहेत.
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने युती सरकारच्या घटक पक्षाने कंबर कसली होती. विविध योजना अमलात आणल्याने भूतो ना भविष्यती विधानसभेत यश मिळाले. आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती शासनातील तिन्ही घटकपक्षांनी आपापल्या पक्ष वाढीला चालना देण्यासाठी कंबर कसली आहे. नवी मुंबईतही शिंदे गटाच्या शिवसेनेच्या गळाला शिवसेना उबाठा गटाचे तब्बल तेरा माजीसेवक कामाला लागले आहेत. यात शिवसेना उबाठा गटाचे, महानगरप्रमुख रतन मांडवे व माजी नगरसेविका पत्नी सुनिता मांडवे, शहरप्रमुख काशिनाथ पवार, माजी नगरसेवक रंगनाथ औटी, भारती कोळी तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक वैभव गायकवाड, दिव्या गायकवाड तसेच शहर संघटक सोमनाथ वास्कर व माजी नगरसेविका पत्नी कोमल वास्कर तर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर अविनाश लाड, माजी नगरसेवक अंकुश सोनावणे, हेमांगी सोनावणे यांचा समावेश असून हे सर्व मंगळवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे पोस्टर शहरभर लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या पक्षप्रवेशामुळे उबाठा गटात एकही सशक्त नेता उरला नाही. अशी चर्चा होत आहे.
अत्यंत प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारा, वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न सोडवणारा, जे शक्य आहे तेच आश्वासन देणारा आणि पाळणारा पक्ष म्हणून शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहरत आहे. आम्ही त्याच जोरावर जनतेचा विश्वास जिंकला आहे. मंगळवारी शहरातील शिवसेना व उ बा ठा आणि काँग्रेस पक्षातील माजी नगरसेवक आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे.
- किशोर पाटकर, (शिवसेना अध्यक्ष शिंदे गट)