
नवी मुंबईतील वाशी एपीएमसी बाजारात हापूस आंब्यांची आवक घटली आहे. गतवर्षीच्या तुलनेने यंदा एप्रिल महिना उजाडूनही हापूस आंब्यांच्या पेट्या बाजारात दाखल होण्याचे प्रमाण घटल्याने व्यापाऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात जवळपास ६० ते ७० हजार पेट्या दाखल होत होत्या; मात्र यंदा एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी देखील केवळ ३० ते ३१ हजार पेट्या दाखल होत असल्याचे व्यापारी राजाराम नवले यांनी सांगितले. दरम्यान इतर राज्यांतील आंब्यांची आवक मात्र वाढली असून ग्राहकांकडून हापूस आंब्याची मागणी सर्वाधिक होऊ लागली आहे.
एपीएमसी बाजारात जानेवारी- फेब्रुवारी महिना सुरू होताच हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. यंदा अवकाळी पावसाने हंगामाला उशिराने सुरुवात झाली. बदलत्या वातावरणामुळे आणि अवकाळी पावसाने उत्पादन खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी वेळेआधीच आंब्याची तोडणी केली. त्यामुळे एपीएमसी बाजारात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दरवर्षीपेक्षा अधिक आवक येऊ लागली. परिणामी दर घसरले. मात्र सद्यस्थितीत चालू एप्रिल महिन्यात बाजारात पुन्हा हापूसची आवक रोडावल्याचे चित्र आहे. आवक घटल्याने हापूसच्या दरात वाढ होऊ लागली आहे. शनिवार ८ एप्रिल रोजी एपीएमसी बाजारात प्रतिपेटी २ हजार ते ४ हजार ५०० रुपये दराने विक्री झाली आहे. तर दुसरीकडे इतर राज्यांतील आंब्याचा हंगाम मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. यंदा मागील वर्षी एप्रिलच्या तुलनेत यंदा हापूस आवक कमी होत आहे. मागील वर्षी एप्रिलपासून एपीएमसीत हापूसच्या ७०-८० हजार पेट्या दाखल होत होत्या. परंतु शनिवारी बाजारात हापूसच्या २९ हजार ८६ पेट्या, तर इतर आंब्यांच्या ४५ हजार ३११ पेट्या दाखल झाल्या आहेत.
एपीएमसी बाजारातील आंब्यांचे सध्याचे दर
हापूस आंबा - २ हजार ते ४ हजार ५०० रुपये (प्रतिपेटी)
बदामी आंबा - ७० ते ९० रुपये (प्रतिकिलो)
लालबाग आंबा - ६० ते ७० रुपये (प्रतिकिलो)
कर्नाटक हापूस - ९० ते १५० रुपये (प्रतिकिलो)
"दरवर्षी हापूसचा खरा हंगाम हा एप्रिल-मे महिन्यात सुरू होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये हापूस बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. दरही आवाक्यात असल्याने मोठ्या संख्येने ग्राहक बाजारात आंबा खरेदीसाठी येतात. दरवर्षी मे महिन्यात ९० हजार ते १ लाख पेट्या दाखल होत असतात. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे उत्पादनावर परिणाम होत हापूसच्या अवघ्या २५ ते ३० हजार पेट्याच दाखल होण्याची शक्यता आहे."
- संजय पानसरे, संचालक, एपीएमसी फळ बाजार