नवी मुंबईत मॉरिशसच्या नागरिकाचा खून, छडा लागला; दोन अल्पवयीन मुलींसह एक तरुण पोलिसांच्या ताब्यात

नवीनकुमार याने बिअर ढोसल्यानंतर दोन्ही मुलींसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही मुलींनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र...
नवी मुंबईत मॉरिशसच्या नागरिकाचा खून, छडा लागला; दोन अल्पवयीन मुलींसह एक तरुण पोलिसांच्या ताब्यात

नवी मुंबई : सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिलवर गत शनिवारी झालेल्या मॉरिशसचा नागरिक नवीनकुमार बाबू (५३) याच्या हत्येचा छडा लावण्यात सीबीडी पोलिसांना यश आले आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी सय्यद मुस्तकीन खान (२०) याच्यासह दोन अल्पवयीन मुलींना अटक केली आहे. मृत नवीनकुमार बाबु याने सदर मुलींसोबत दारु पिऊन गैरवर्तन केल्याने या तिघांनी मिळून त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने खान याला २२ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. तर चेंबूर येथून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही मुलींची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकरणातील आरोपी सय्यद मुस्तकीन खान हा नवीनकुमार राहत असलेल्या शहाबाज गाव परिसरातच राहत होता. नवीनकुमार त्याठिकाणी राहण्यास आल्यापासून खान याची त्याच्यासोबत चांगली ओळख झाली होती. चेंबुर येथे राहणाऱ्या १६ आणि २७ वयोगटातील दोन अल्पवयीन मैत्रिणी खानला भेटण्यासाठी येत असल्याने नवीनकुमार यांची देखील त्या मुलींसोबत मैत्री झाली होती. त्यानंतर गेल्या एक महिन्यापासून नवीनकुमार हा त्या मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होते. दोन्ही अल्पवयीन मुली या चेंबूरमधील नटराज चित्रपटगृहाजवळच्या फूटपाथवर राहत होत्या. तसेच त्या बेलापूर सिग्नलवर पुस्तकांची विक्री करत होत्या.

शुक्रवारी मध्यरात्री मृत नवीनकुमार याने बेलापूर रेल्वे स्थानकाजवळ या मुलींची भेट घेतल्यानंतर त्याने दोघींना दुचाकीवरुन पारसिक टेकडीवर नेले. त्याठिकाणी नवीनकुमार याने बिअर ढोसल्यानंतर त्याने दोन्ही मुलींसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही मुलींनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर देखील नवीन कुमार याने त्यांच्यासोबत गैरवर्तन सुरुच ठेवल्याने अखेर त्यांच्यात मारामारी सुरु झाली. यादरम्यान, एका मुलीने आरोपी खान याला याबाबतची माहिती दिल्यानंतर तो काही वेळात पारसिक टेकडीवर पोहोचला. मात्र तो टेकडीवर पोहोचेपर्यंत दोन्ही मुलींनी नवीनकुमारला दगडाने मारायला सुरुवात केली होती.

त्यामुळे खानही त्यांच्यात सामील झाला. त्यानंतर त्या तिघांनी नवीनकुमार याचा मृत्यू होईपर्यंत त्याला दगडाने मारहाण केली. त्यानंतर तिघांनी त्याठिकाणावरुन पलायन केले. शनिवारी सकाळी नवीनकुमार यांच्या डोक्यामध्ये दगड घालुन त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सीबीडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. यावेळी बेलापूर येथील शाहबाज गावात राहणारा आरोपी सय्यद मुस्तकीन खान व नवीन कुमार यांच्यामध्ये असलेल्या मैत्रिची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने गुह्याची कबुली दिली. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली.

या घटनेतील मृत नवीनकुमार बाबू हे मुळचे मॉरिशस देशाचे नागरिक असून ते ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया (ओसीआय) मिळवून आठ महिन्यांपूर्वी मॉरिशसहून भारतात आले होते. त्यानंतर २२ वर्षांच्या मुलासह ते बेलापूर येथील शाहबाज गावात राहत होते. नवीनकुमार आणि त्यांचा मुलगा हे दोघेही कामाच्या शोधात होते. काही महिन्यापुर्वी नवीनकुमार यांच्या मुलाला तीन तारांकित हॉटेलमध्ये नोकरी मिळाली होती. यादरम्यान, नवीनकुमार याची आरोपी खान याच्यासोबत ओळख झाली होती.

logo
marathi.freepressjournal.in