उरण: तालुक्यातील एमआयडीसीचे रानसई धरण आटले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत १ फुटाने पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे एमआयडीसी हे पाणी पावसाळ्यापर्यंत लोकांना कसे पुरवता येईल या विवंचनेत आहे. हा पाणीपुरवठा ३० जूनपर्यंत उरणकरांना पुरविण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि शुक्रवार पाणीकपात सुरू करण्यात आली आहे.
सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा विभागाकडून रोज ४ एमएलडी पाणी एमआयडीसीने उरणकरांसाठी घेणे सुरू केले आहे. गेल्यावर्षी पावसाने लवकर काढता पाय घेतल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात कमी आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत २४ दिवसांचा पाणीसाठा कमी झाला. उरण तालुक्याला रोज १० एमलडी पाण्याची गरज लागते. त्यापैकी ६ एमएलडी पाणी रानसई धरणातून घेतले जाते, तर रोज ४ एमएलडी पाणी सिडकोकडून विकत घेऊन उरण करांची गरज भागवली जाते.
उरण तालुक्याला आणि येथे असलेल्या प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी १९७०च्या दशकात हे धरण बांधण्यात आले होते. रानसईच्या निसर्गरम्य अशा डोंगर कपारीत हे धरण बांधले आहे. सुमारे ६.८ चौरस किलोमीटर क्षेत्रात हे धरण आहे. या धरणात दहा मिलियन क्युबिक मीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे; मात्र गेल्या वर्षी पाऊस लवकर गेल्याने धरणाच्या पाणीसाठा कमी झाला. सध्या या धरणात २६ मार्च अखेर ९८.४ फुटापर्यंत पाण्याची पातळी आहे. गेल्यावर्षी हेच पाणी ९९.३ फूटपर्यंत होते. रानसई धरणात ३.९ एमसीएम पाणीसाठी शिल्लक आहे. शिल्लक पाणीसाठा ३० जूनपर्यंत नागरिकांना पुरविण्यासाठी एमआयडीसीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
सिडकोकडून १० एमएलडी पाण्याची मागणी केली होती; मात्र सिडको सध्या रोज ४ एमएलडी पाणी देत असून, ३० जूनपर्यंत हे पाणी पुरणार आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन केले आहे आणि सिडकोने आणखी 3 एमएलडी पाणी द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. जर सिडकोने हे पाणी दिले नाही, तर उरणकरांना आठवड्यातून तीन दिवस पाणीकपात करावी लागेल.
-विठ्ठल पाचपुंड,
उपअभियंता, एमआयडीसी, उरण
धरणातून दररोज ३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा
या रानसई धरणातून उरण तालुक्यातील २० ग्रामपंचायती, उरण नगरपरिषद आणि ओएजीसी, बीपीसीएल, एनएडीसारख्या इतर मोठ्या प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. उरण तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून, मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास झाल्याने येथे येणाऱ्या या प्रकल्पांना या धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणातून दररोज सुमारे ३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.