नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीय दुकानदाराला बदडल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐरोली भागात गुरूवारी (दि.२०) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. उत्तर भारतीय दुकानदाराने मराठी बोलण्यास आणि मराठी गाणी वाजवण्यास नकार दिल्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्ते दुकानात घुसले आणि त्याला चांगलाच चोप दिला.
मराठी बोलणार नाही, मराठी गाणी लावणार नाही, असा पवित्रा ऐरोलीमधील एका दुकानदाराने घेतला होता. त्यामुळे गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास संतप्त झालेला मनसे कार्यकर्त्यांचा जमाव दुकानात घुसला. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हिडिओनुसार, दुकानात घुसताच एका कार्यकर्त्याने शिवीगाळ करीत दुकानदाराच्या कानशिलात लगावली आणि मराठी गाणी लावावीच लागतील, मराठीत बोलावंच लागेल अन्यथा दुकान बंद करु, अशी तंबी त्याला दिल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं.
प्राथमिक माहितीनुसार, एक मराठी ग्राहक कॅफेमध्ये गेला असता त्याने हिंदीऐवजी मराठी गाणी वाजवण्याची विनंती दुकानदाराला केली. पण, दुकानदाराने त्याला मराठी गाणी वाजवणार नाही असे उद्धटपणे सुनावले. विनंती करुनही दुकानदार मराठी गाणी वाजवण्यास तयार नव्हता.
या गोष्टीचा राग आल्यामुळे त्या ग्राहकाने परिसरातील मनसेच्या कार्यकर्त्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी परप्रांतीय दुकानदाराला चांगलाच चोप दिला. दुकानदाराची ओळख आणि मारहाण करणाऱ्यांवर काही कारवाई झाली की नाही, याबाबत अद्याप समजू शकलेले नाही.