उरण : उरणची जीवनवाहिनी बनलेली लाँच सेवा सागरी मार्गातील गाळ काढण्याच्या कामासाठी दररोज दोन ते तीन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मोरा बंदरालगतचा गाळ काढण्याचे काम सहा दिवस होणार आहे.
उरण ते मुंबई दरम्यान सुरू असलेली लाँचसेवा ही उरणच्या रहिवाशांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. परंतु, समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे या मार्गावरील मोरा बंदरालगत सातत्याने गाळ जमा होतो. परिणामी लाँच वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे, ओहोटीच्या वेळेस लाँचसेवा तीन ते चार तास बंद ठेवावी लागते.
२९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान मोरा जेट्टीलगतचा गाळ काढण्याचे काम करण्यात येणार आहे. या दिवसांत दुपारी सुमारे दोन ते तीन तास लाँचसेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी यांनी दिली आहे. दरम्यान, फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या लोकलसेवेमुळे लाँचने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे.