मोरा सागरी पोलीस ठाण्याची इमारत निधीअभावी रखडली: आणखी दीड कोटींच्या निधीची आवश्यकता, बांधकाम खर्चात वाढ

मोरा बंदराच्या जवळपास शासनाकडून सागरी पोलीस ठाण्याची अद्यावत इमारतीसाठी जागा अखेरपर्यंत मिळालीच नाही.
मोरा सागरी पोलीस ठाण्याची इमारत निधीअभावी रखडली: आणखी दीड कोटींच्या निधीची आवश्यकता, बांधकाम खर्चात वाढ

उरण : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील सुरक्षेसाठी सागरी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्यातील उरणच्या मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम निधी अभावी पाच वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे ८५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेला इमारतीचा सांगाडा हा या परिसरातील सरपटणाऱ्या आणि मोकाट प्राण्यांच घर बनले आहे. पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लागणारा आवश्यक निधी देण्याची घोषणा उरणमधील एका कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती; मात्र वेळेत निधी मिळाला नसल्याने बांधकाम खर्चात वाढ झाली आहे.

उरण तालुक्यासाठी तीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये देशाच्या सुरक्षेला सागरी मार्गावरून अधिक धोक्याची शक्यता गृहीत धरून स्वतंत्रपणे कारभार पाहण्यासाठी मोरा सागरी पोलीस ठाणे उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मोरा येथे सध्या अस्तित्वात असलेल्या पोलीस ठाण्याची जागा कामकाजासाठी अत्यंत अपुरी पडत आहे. अपुऱ्या जागेमुळे कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नवीन इमारत उभारण्यासाठी वन, बंदर व महसूल विभागाकडे जागेची मागणी करण्यात आली होती; मात्र मोरा बंदराच्या जवळपास शासनाकडून सागरी पोलीस ठाण्याची अद्यावत इमारतीसाठी जागा अखेरपर्यंत मिळालीच नाही. यामुळे मोरा येथील जुन्या जागेतच मागील अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्याचा कारभार सुरू असतानाच चार वर्षांपूर्वी मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवीन इमारत उभारण्यासाठी शासनाने आवश्यकतेनुसार उरण शहरात जागा उपलब्ध करून दिली आहे.

जागाही अपुरी

पोलीस ठाण्याची आवश्यकतेनुसार अद्ययावत इमारत उभारण्याच्या बांधकामासाठी ८६ लाखांच्या निधीच्या तरतुदीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित कामाला सुरुवातही करण्यात आली; मात्र सुमारे २४८ चौमी क्षेत्रफळाच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या एकमजली इमारतीच काम (सांगाडा) पूर्ण झाला आहे. या इमारतीच्या कामासाठी ८६ लाख ४८ हजार रुपयांचा निधी तसेच जागाही अपुरी पडली आहे. अर्धवट व ओसाड असलेल्या पोलीस ठाण्याच्या इमारतीचा वापर आता समाजकंटक, गर्दुल्ले यांच्याबरोबरच येथील काही युवाप्रेमींही पुरेपूर उठवताना दिसत आहेत. प्रेमात न्हाऊन निघालेल्या प्रेमीयुगुलांसाठी अर्धवट अवस्थेतील ही पोलीस इमारत म्हणजे प्रेमीयुगुलांचे ठिकाण ठरू लागले आहे.

मोरा सागरी पोलीस ठाण्याचे काम पूर्ण करण्यासाठी बांधकाम खर्चात आणखी वाढ होऊन त्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी पोलीस विभागाकडे करण्यात आली आहे.

- नरेश पवार, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in