आठ वर्षीय मुलीसह आईची आत्महत्या

पनवेलमध्ये राहणाऱ्या एका ३७ वर्षीय महिलेने आपल्या ८ वर्षीय मुलीला २९ व्या मजल्यावरून खाली फेकून देत स्वत: देखील उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
आठ वर्षीय मुलीसह आईची आत्महत्या
प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

पनवेल : पनवेलमध्ये राहणाऱ्या एका ३७ वर्षीय महिलेने आपल्या ८ वर्षीय मुलीला २९ व्या मजल्यावरून खाली फेकून देत स्वत: देखील उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदरची घटना पनवेलमधील पळस्पे येथील मॅरेथॉन नेक्सॉन गृहनिर्माण संकुलातील ऑरा इमारतीत बुधवारी सकाळी घडली. या घटनेतील मृत महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे सदरचा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला, तरी कौटुंबिक कारणावरून सदरचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. पनवेल शहर पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

या घटनेतील मृत मुलीचे नाव मायरा (८) असे असून, तिला २९ व्या मजल्यावरून खाली फेकून देणाऱ्या तिच्या आईचे नाव मैथिली आशिष दुआ (३५) असे आहे.

मैथिली ही पती आशिष दुआ (४१) व मुलगी मायरा यांच्यासोबत राहत होती. बुधवारी सकाळच्या सुमारास सुमारास मैथिलीने मुलगी मायराला बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकून दिले. त्यानंतर तिने देखील त्याच ठिकाणावरून खाली उडी टाकून आत्महत्या केली.

यावेळी आशिष दुआने खाली जाऊन पाहणी केली असता, मुलगी मायरा व पत्नी मैथिली या दोघीही मृतावस्थेत आढळून आल्या. मैथिलीने आपल्या ८ वर्षीय मुलीला खाली फेकून दिल्याने तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अकस्मात मृत्यूची नोंद

मैथिली हिला मानसिक आजार होता, त्यामुळे ती उपचार घेत होती. मात्र, काही दिवसांपासून तिची औषधे संपली होती, त्यामुळे ती नियमित औषध घेत नव्हती. त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे तिने सदरचा प्रकार केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in