
नवी मुंबई : सीबीडी-बेलापूर भागात राहणाऱ्या एका तरुणाने शेजारी राहण्यासाठी आलेल्या एका नवविवाहितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. शिवा गोपाल चौहान (२५) असे या आरोपीचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या घटनेतील आरोपी शिवा चौहाण हा बेलापूरमध्ये राहण्यास असून तो इलेक्ट्रिशियन काम करतो. तर २१ वर्षीय पीडित विवाहिता आरोपीच्या शेजारी राहण्यास असून तिचे नुकतेच लग्न झाले आहे. लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच ती बेलापूर राहण्यास आली होती. बुधवारी पीडित नवविवाहिता आपल्या घरामध्ये साफसफाईचे काम करत असताना, आरोपी शिवाने तिला काम असल्याचे सांगून आपल्या घरामध्ये बोलावून घेतले.
आरोपी शिवाने पीडित विवाहितेला जबरदस्तीने आपल्या घरामध्ये खेचून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर पीडित नवविवाहितेने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या पतीला दिल्यानंतर तिने एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
एनआरआय पोलिसांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन आरोपी शिवा चौहाणविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला रात्री अटक केली आहे.