घणसोलीत ३ अनधिकृत इमारतींवर पालिकेचा हातोडा

इमारतीचे बांधकाम करताना नवी मुंबई महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक होते.
घणसोलीत ३ अनधिकृत इमारतींवर पालिकेचा हातोडा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. शुक्रवारी महापालिका अतिक्रमण विभागाने घणसोली विभागातील गोठीवली, तसेच शिवाजी तलावाजवळ सुरू असलेले ३ अनधिकृत इमारतीचे बांधकाम जमीनदोस्त केले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने प्रत्येक विभाग कार्यालयाद्वारे कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

त्यानुसार महापालिका अतिक्रमण विभागाने घणसोली विभागातील मरिआई गोठिवली जवळ मंगेश मारुती म्हात्रे आणि रूपेश सदानंद म्हात्रे यांनी केलेले तळमजला अधिक तिसऱ्या मजल्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करून ते जमिनदोस्त केले. तसेच शिवाजी तलाव परिसरातील कापरीबाबाबा नगरमधील अनंत म्हात्रे आणि रूपेश हिरा पाटील यांनी विना परवानगी अनधिकृतरीत्या सुरू केलेल्या बांधकामवर देखील अतिक्रमण विभागाने कारवाई केली.

इमारतीचे बांधकाम करताना नवी मुंबई महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र यापैकी कोणीही महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे काम सुरू केले होते. महापालिकेच्या घणसोली विभागामार्फत संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत नोटीस देऊन सुद्धा सदरचे अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते. त्यानुसार सदरच्या तीन ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महापालिका व सिडकोच्या अतिक्रमण विभागाने संयुक्तरीत्या ही तोडक मोहीम राबवून सदरचे बांधकाम पाडले. या कारवाईसाठी २ पोकलेन मशिन्स व १२ कामगारासह घणसोली विभागातील अधिकारी, कर्मचारी व सिडको अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस पथक तैनात होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in